आंबा घाटातील वाहतुक तासाभरात पूर्ववत 

रत्नागिरी:- सह्याद्रीच्या खोर्‍यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा घाटातील भुसभुशीत झालेली माती पाण्याबरोबर रस्त्यावर आली. हा प्रकार दखन येथे घडला. महामार्गावर चिखल पसरल्याने वाहतूकीत अडथळा आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अवघ्या तासाभरात माती हटवल्याने वाहतूक सुरळीत झाली.

जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीत आंबा घाटात दख्खन गावाच्या बसस्टॉपजवळ भुस्खलन झाले होते. उन पडल्यामुळे पाणी सुखल्याने माती भुसभुशीत झाली. रविवारी (ता. 10) सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याबरोबर माती रस्त्यावर आली. माती व पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या बाजूला गटारे आहेत; मात्र ती माती मिश्रीत चिखलाने भरुन गेली. उरलेली माती प्रचंड पाण्याच्या झोताबरोबर रस्त्यावरुन वाहू लागली. दगड, माती रस्त्यावर आल्यामुळे वाहने चालवणे अशक्य झाले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी साखरपा येथील चेकपोस्टवर वाहतूक थांबवून ठेवली. रस्त्यावर आलेली माती बाजूला टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्वरीत जेसीबी आणि कामगार घटनास्थळी पाठविण्यात आले. हा प्रकार सात ते आठ वाजण्याच्या सुमारास घडला होता. रात्री 11 वाजेपर्यंत रस्त्यावर आलेली माती बाजूला काढून टाकण्यात आली. कोल्हापूरकडून येणारे पिकअप किंवा त्यासारखी वाहने मार्गक्रमण करत होती; मात्र कार चालकांना तेथून वाहने हाकणे शक्य होत नव्हते. येथून पुढे जाण्याच्या नादात एक कार घटनास्थळी अडकून पडली होती. टायर्स् कमी जाडीचे असल्याने हा प्रकार घडला होता. रात्री उशिरा वाहतूक सुरळीत झाल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, आंबा घाटातील वाहतूक रात्री काही काळासाठी थांबवल्याने कोल्हापूरहून रात्रीच्यावेळी रत्नागिरीकडे येणार्‍या व्यापार्‍यांच्या गाड्या अणुस्कुरामार्गे पाठविण्यात आल्या. त्यात भाजीपाला आणणार्‍या वाहनांचा समावेश आहे. काही गाड्यांनी भाजीपाला रत्नागिरीत आणल्या नाहीत.
सोमवारीही (ता. 11) आंबा घाटातील साफसफाईचे काम सुरु होते. पाणी निचरा होण्यासाठी गटारातील माती काढण्याचे काम दिवसभर सुरु होते. त्यामुळे पुन्हा पाऊस पडला तर माती रस्त्यावर येणार नाही याची तजवीज करण्यात आली होती.