पडवणेवाडीतील २५ घरांना समुद्राचा धोका  

मोठ्या प्रमाणात अतिक्रमण; यंदा २० फूट किनारा गिळंकृत


रत्नागिरी:-तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसूत स्मारकाजवळ असलेल्या पडवणेवाडीवर समुद्राच्या अतिक्रमणाचे मोठे संकट येऊन ठेपले आहे. गेल्या काही वर्षांपासून समुद्राने थोडा-थोडा या गावाचा किनारा गिळंकृत केला आहे. यंदा तर १५ ते २० फूट जमिनीचा भाग तुटुन तो समुद्रात वाहुन गेला आहे.  त्यामुळे तेथील २५ घऱांना धोका निर्माण झाला असून उधाणाच्या भरतीवेळी ती भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या भागात धूपप्रतिबधक बंधारा घालून संरक्षण करावे, अशी मागणी पडवणेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.

 
जिल्ह्याच्या किनाऱ्यावर ठिकठिकाणी समुद्राचे अतिक्रमण वाढले आहे. मिऱ्या, काळबादेवी, सोमेश्वर खाडी, गुहागर, हर्णै, नाटे आदी भागात ही परिस्थिती आहे. समुद्राचे अतिक्रमन रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाय योजना करून सुमारे ३५ ते ४० ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. तो मंजूर झाला आहे. त्यामुळे या भागातील किनाऱ्यांची सुरक्षा होणार आहे. तसेच मिऱ्या येथील सुमारे साडे तीन किमीचा सर्वांत मोठा धूपप्रतिबंधक बंधारा बांधला जाणार आहे. १९० कोटीचे हे काम आहे. लवकरच या कामाला सुरवात होणार आहे. मात्र हे सर्व करत असताना तालुक्यातील पडवणेवाडी दुर्लक्षित राहिली आहे. या भागात देखील समुद्राने घुसखोरी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून समुद्र थोडा-थोडा करून काही मिटरचा किनारा गिळुन टाकला आहे. आता तर समुद्र तेथील वस्तीच्या घराजवळ येऊ लागला आहे.
पडवणेवाडी  ही वरवडे ( भंडारवाडा ) या गावाचे मुलभूत अंग आहे. प्राचीन काळापासूनची प्रस्थापित आहे. परंतु या पडवणेवाडीकडे आता सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. तली खाडी ही केसपुरची खाडी म्हणून ओळख  होती आता  पडवणेखाडी म्हणून आताची पिढी तिला ओळखते. पडवणेवाडी खाडी आणि समुद्र याचा मध्यबिंदू आहे. याच पडवणेवाडीवर आता मोठे नैसर्गिक संकट आले आहे. पडवणेवाडीला पुढून आणि मागुन, बाजूने अशी तिन्हीकडून समुद्राचे अतिक्रमन सुरू आहे. अजस्र लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत आहेत. त्यामुळे किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप सुरू आहे. किनाऱ्याच्या संरक्षणासाठी कोणताही बंधारा नाही. निव्वळ वाळुचा तट होता, तोही खाडीच्या पुराने व समुद्राने यंदा १५ फूट भाग तुटून वाहून गेला आहे. त्यामुळे येथील २५ एक घर भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. वाडीच्या संरक्षणासाठी दोन्ही बाजूने संऱक्षण बंधारा बांधावा, अशी मागणी होत आहे.