दरेकरांनी मागितली कोविड काळातील खर्चाची माहिती

२९ कोटी खर्च ; जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र, तपशील कागदपत्रही मागविली

रत्नागिरी:- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि बाधितांवर योग्य उपचार होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गेल्या पावणे दोन वर्षांमध्ये २९ कोटी रुपये खर्च केले. मात्र या खर्चाबाबत आणि वस्तू, साहित्य खरेदीकडे काहींनी बोट दाखविले आहे. याची दखल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दखल घेतली आहे. त्यांनी कोविडकाळातील खरेदीबाबतचा संपूर्ण तपशील जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितला आहे. तसे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना दिले आहे.

 
जिल्हा प्रशासनाच्या खरेदीवर यापूर्वीच काही राजकीय नेतेमंडळीनी बोट दाखविले होते. तसे पत्रही संबंधित यंत्रणेला देण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने २०२० ते २०२१ व २०२१ ते २०२२ या कालावधीमध्ये कोविडच्या उपायोजनेसाठी सुमारे २९ कोटी रुपयांची खरेदी केली आहे. या सर्व खरेदीचा तपशील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेने प्रविण दरेकर यांनी मागितला आहे. कोविडचे संकट असताना जिल्ह्यासाठी स्वतंत्र कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली. ऑक्सिजन प्लॅन्ट, लिक्विड टॅंकरची उभारणी,  बेड, गाद्या,  सिलेंडर, व्हेंटिलेटर, औषध खेरीद करण्यात आली.

जिल्हा नियोजनमधून यासाठीचा निधी खर्च करण्यात आला आहे. या संपूर्ण खरेदीत पारदर्शकता आहे का, याची पडताळणी विरोधी पक्षनेते दरेकर हे करणार आहेत. खरेदी कोणत्या पुरवठादाराकडून करण्यात आली. खरेदीची पद्धत कोणती होती, निविदा प्रक्रियेत किती पुरवठादारांनी भाग घेतला, त्यांचे दर काय हेते, कोणत्या दराला मंजूरी देण्यात आली. याची सविस्तर माहिती व कागदपत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागविली आहेत. विधीमंडळ कामगाचासाठी विरोधी पक्षनेते या अधिकाराने आपण ही माहिती मागवित असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.