पहिल्याच दिवशी 1 लाख 15 हजार विद्यार्थी ‘हजर’ 

रत्नागिरी:- घराच्या चार भिंतीत ऑनलाईन शिक्षणात गुरफटलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता. 4) उत्साहात आणि आनंदात शाळेमध्ये हजेरी लावली. ग्रामीण भागात काही ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या तर काहींनी मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्ह्यातील 1900 शाळांमध्ये 1 लाख 15 हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. वर्गात बसताना सोलश डिस्टन्सिंग, तोंडावर मास्क आणि प्रवेशद्वारावर थर्मल तपासणीचे नियम पाळत पहिला दिवस जिल्ह्यात पार पडला.

शासनाच्या आदेशानंतर शिक्षण विभागाकडून तत्काळ पाचवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यासाठी पावले उचलली. सोमवारी सकाळी आठ वाजता सकाळी वर्ग सुरु झाले. कोरोनामुळे विद्यार्थी घरामधूनच ऑनलाईन शिक्षण घेत होते. वर्षभरानंतर प्रत्यक्ष अध्यापन सुरु झाल्याने मुलांच्या चेहर्‍यावर शाळेत येण्याचा आनंद ओसंडून वाहत होता. कोरोनाचे निकषांचे पालन करण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर थर्मल तपासणीची व्यवस्था केली होती. विद्यार्थ्यांना एक मीटर अंतर ठेवून उभे करण्यात आले. चेहर्‍यावर मास्क असले तरीही शाळेत प्रवेश घेण्याचा उत्साह प्रत्येकामध्ये होता. ग्रामीण भागात लोकप्रतिनिधींनी शाळा प्रवेशोत्सवासाठी वेगवेगळ्या संकल्पना लढविल्या होत्या. त्यांना पालकांकडूनही प्रतिसाद मिळाला.

ढोल-ताशांच्या गजरात स्वागत मिरवणूक, मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत, काही ठिकाणी मुलांना फुगे भेट देण्यात आले होते. महिलांनी औक्षण करुन केलेले स्वागत यामुळे कोरोनानंतर शाळेच्या पहिल्या दिवसाला उत्सवाचे स्वरुप आले होते. शहरी भागात मात्र कोरोनाचे सावट पहायला मिळाले. स्वागतापेक्षाही नियमांचे पालन करण्यांवर शाळांचा भर होता. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक मिळून पावणेतीन हजार शाळा आहेत. त्यातील पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावीच्या सुमारे दोन हजार शाळा आहेत. त्या शाळा सुरु होतील अशी अपेक्षा ठेवून शिक्षण विभागाकडून नियोजन केले होते. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. 1 हजार 900 शाळातील अध्यापन सुरु झाले. सव्वा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांपैकी एक लाख पंधरा हजार विद्यार्थी शाळेत हजर झाले होते. कोरोना तपासणी व चाचणी केंद्रासह बाधित सापडणार्‍या गावांमधील काही शाळांनी आज मुहूर्त साधलेला नव्हता. दरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. पी. यादव, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, सुधाकर मुरकुटे, रविंद्र कांबळे यांच्यासह गटशिक्षणाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन शाळांमधील परिस्थितीची पाहणी केली.