रत्नागिरीतील मासेमारी नौकेवर चीनची यंत्रणा; देवगडमध्ये कारवाई

रत्नागिरी:- येथील सागरी सुरक्षा यंत्रणेच्या तपासणीत एका मच्छीमारी नौकेवर चिनी बनावटीची यंत्रणा आढळल्याने खळबळ माजली. बाहेरील मच्छीमारी नौका येथे आल्याचा प्राथमिक संशय वाढल्याने हालचालींना वेग आला; मात्र अधिक तपास करता संबधित मच्छीमारी नौका रत्नागिरी येथील असल्याचे समोर आले; मात्र नौकेवरील ‘अ‍ॅटोमेटिक अ‍ॅडिंटीफिकेशन सिस्टिम’ चायनीज बनावटीची असून ती नोंदणीकृत नसल्याचे आढळले. त्यामुळे मच्छीमारी नौका येथील बंदरात आणून पुढील कार्यवाहीसाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.


आता राज्यातील सागरी मासेमारीचा बंदी कालावधी उठल्याने मच्छीमारी हंगाम सुरू झाला आहे. त्याचप्रमाणे आता पावसाचा जोर कमी झाल्याने सागरी गस्तीलाही सुरूवात झाली आहे. किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी यंत्रणेचे लक्ष केंद्रीत झाले आहे. तसेच समुद्रातही गस्त घालण्याचे काम सुरू आहे. सुरक्षा यंत्रणेची सागर गस्त सुरू असताना काल रविवारी एका मच्छीमारी नौकेची तपासणी करता त्यावर बसवण्यात आलेली यंत्रणा चायनीज असल्याचे समोर आले. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेमध्ये एकच खळबळ माजली. बाहेरील राष्ट्राची बोट असल्याचा प्राथमिक संशय आल्याने सुरक्षा यंत्रणा अधिकच सतर्क झाली; मात्र अधिक तपासणी करता ती रत्नागिरी येथील मच्छीमारी नौका असल्याचे समोर आले.


याबाबत येथील सागरी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे यांना विचारले असता ते म्हणाले, गस्त घालताना मच्छीमारी नौकेची तपासणी केली असता त्यावरील ‘अ‍ॅटोमेटिक अ‍ॅडिंटीफिकेशन सिस्टिम'(ए.टी.एस.) यंत्रणा चायनीज बनावटीची असल्याची आढळली. तसेच बसवण्यात आलेली यंत्रणा नोंदणीकृत नाही असेही तपासणीत समोर आले. त्यामुळे संबधित मच्छीमारी नौका येथील बंदरात आणून ठेवण्यात आली असून पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात देणार आहे.