एसटीचा रुट ठरवणार आता चालक-वाहक

भारमान वाढण्यासाठी नवी शक्कल; तोटा भरून काढण्याचा प्रयत्न

रत्नागिरी:- गणेशोत्सवापासून एसटीची वाहतूक पूर्वपदावर येत आहे. महामंडळाने एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. कोणत्या मार्गावर अधिक भारमान आहे, कोणत्या मार्गावर कमी, याची माहिती चालक-वाहकांना असते. त्यामुळे यापुढे चालक-वाहकांनी सुचवलेल्या मार्गावर एसटीच्या फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यानुसार आगारामध्ये स्वतंत्र रजिस्टर ठेवले असून त्यामध्ये चालक-वाहकांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी वारंवार अनेक प्रयत्न महामंडळाकडून केले जात आहेत. त्यासाठी कोरोना काळात एसटी वाहतूकसेवेत दाखल झाली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र अजूनही ग्रामीण भागामध्ये कोरोनाची भिती कायम असल्याने शासनाच्या सूचनेने एसटी सेवा पूर्ववत केली असली तरी अनेक मार्गावर अपेक्षित भारमान मिळत नाही; मात्र तरी तोटा सहन करून तो मार्ग सुरू ठेवावा लागतो. तोटीतील फेऱ्या न परवडणाऱ्या असल्याने कोणत्या फेऱ्या सुरू ठेवाव्यात आणि कोणत्या बंद याबाबत थेट एसटी चालक- वाहकांनाच आवाहन करण्यात आले आहे. कोणत्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद चांगला असतो, कोणत्या मार्गावर कमी प्रवाशी नसतात, कुठल्या वेळेत फेरी सुरू करणे आवश्यक आहे. याची माहिती कर्तव्यावर असलेल्या चालक- वाहकांना असते. चालक-वाहकांनी कोणत्या मार्गावर कोणत्या वेळेत फेऱ्या सुरू ठेवाव्यात यासाठी माहिती देण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी नोंदवही ठेवण्यात आली आहे. प्रत्येक आगारातून रजिस्टरवरील सूचना पाहून संबंधित मार्गावर फेऱ्या सुरू किंवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तोट्यातील अनावश्यक फेऱ्या रद्द करून भारमान अधिक असलेल्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.