आयुक्त कार्यालयात कामगिरीवर असलेल्या 16 जणांना आठ दिवसांत मूळ जागी हजर करा 

जि. प. सभेत ठराव; हजर न झाल्यास पगार थांबवणार

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेचा प्रशासकीय कारभार सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचार्‍यांच्या कामगिरीवर तात्पुरत्या केलेल्या नियुक्त्यांना कोकण आयुक्तांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्या तत्काळ रद्द करण्याचे निर्देश दिले आहे. आयुक्तांच्या निर्णयावर जिल्हा परिषदेत तिव्र नाराजी व्यक्त केली जात असून जशास तसे उत्तर देण्यासाठी आयुक्त कार्यालयात गेली अनेक वर्षे कामगिरीवर कार्यरत असलेल्या 16 जणांना आठ दिवसात मुळ जागी हजर करा अन्यथा त्यांचा पगार काढला जाणार नाही असा ठराव सर्वसाधारण सभेत करण्यात आला आहे.

आयुक्तांनी जिल्हा परिषदेला पत्र देऊन जिल्हास्तरावर करण्यात आलेल्या तात्पुरत्या कामगिरीवरील नियुक्तांवर प्रशासनाला खडसावले. आयुक्तांचे अधिकार तिकडे कसे वापरले गेले अशी विचारणा केली होती. या विषयावर अध्यक्ष विक्रांत जाधव यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. उपाध्यक्ष उदय बने, संतोष थेराडे यांच्यासह अन्य सदस्यांनीही आयुक्तांच्या पत्रावर तिव्र नापसंती व्यक्त केली. जिल्हा परिषदेतील अनेक पदे रिक्त आहेत. स्थानिक पातळीवर प्रशासन चालवताना अडचणी येऊ नयेत यासाठी कामगिरीवरील तात्पुरत्या नियुक्त्या केल्या जातात. काहींचे प्रस्ताव आयुक्तांकडे मंजूरीसाठीही पाठवण्यात येतात. तरीही कोकण आयुक्तांनी त्या कामगिरीवरील नियुक्त्या रद्द करा असे पत्र प्रशासनाला दिले आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. कोकण आयुक्तांकडून घेतलेल्या पवित्र्याला चोख प्रत्यूत्तर देण्यासाठी जिल्हा परिषदेत पगार घेत असलेले, परंतु प्रत्यक्ष काम आयुक्त कार्यालयात करणार्‍यांना कार्यमुक्त करा असा निर्णय घेतला आहे. मागील सतरा वर्षांपासून सोळा कर्मचारी या पध्दतीने नियुक्त करण्यात आले आहेत. कामगिरीवर असल्यामुळे त्या जागा रिक्तही दाखवल्या जात नाहीत. परिणामी ती पदे भरण्याचा प्रस्ताव ठेवता येत नाही. त्यांना आयुक्त कार्यालयातच कायम केले गेले तर रत्नागिरीतील जागा रिक्त होतील. त्या भरण्यासाठी कार्यवाही करता येऊ शकते. त्यांना आठ दिवसात मुळ जागेवर पाठवावे अन्यथा त्यांचा पगार काढला जाणार नाही, असा इशारा अध्यक्ष विक्रांत यांनी दिला आहे. स्थानिक परस्थितीचा विचार न करता निर्णय घेतले जात असतील तर त्यांनाही त्यानुसार पलटवार करावे अशा प्रतिक्रिया सदस्यांनीही उपस्थित केल्या.