मंडणगड:- तालुक्यातील पेवे उंबरशेत खलाटी येथे मंडणगड पोलीसांना 9 गावठी बॉम्ब सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हे बॉम्ब शिकारीसाठी होते का याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र गावठी बॉम्ब सापडण्याची हि मंडणगड येथील पहिलीच घटना असल्याने त्याचे तीव्र पडसाद तालुक्यात उमटले आहेत.
या संदर्भात मंडणगड पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर 2021 रोजी पोलिसांना टीप मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पेवे उंबरशेत खलाटी या ठिकाणी पोलीस पथकाने सापळा रचला होता. यात केलेल्या धडक कारवाईत तीन संशयीत आरोपींसह 9 गावठी बॉम्ब हा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.
पुढील तपासास बाधा येऊ नये याकरिता अधिकची माहीती पोलीसांकडून मिळालेली नाही. पोलीसांकडून या विषयासंदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून अधिक तपास युध्द पातळीवर सुरु आहे. बुधवारी पोलीसांनी केलेल्या कारवाईत पोलीस निरिक्षक शैलजा सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गफार सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल वैभव गमरे, पोलीस कॉन्स्टेबल ऋषीकेश देसाई यांनी सहभाग घेतला.