८३ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवेला मुदतवाढ

रत्नागिरी:-कोरोना काळामध्ये जीव धोक्यात टाकून काम करणाऱ्या जिल्ह्यातील ८३ सदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे कोरोना महामारीचा संसर्ग कमी झाल्यामुळे या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कमी करण्याचा घाट होता. आरोग्य विभागाने ८३ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी याला दुजोरा दिला. 

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीचा विळखा आहे. बाधित वाढत गेल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत गेला. कमी मनुष्यबळाचा परिणाम रुग्णसेवेवर होऊ नये याची खबरदारी आरोग्य विभागाने घेतली. दोन वर्षांपासून ठेकेदार पद्धतीवर ८३ सदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका आरोग्य विभागाने केल्या. या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रावर व कोविड सेंटरवर सेवा बजावण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. कोरोनाच्या भीतीमुळे बाधितांचे नातेवाईकही पुढे येत नव्हते. तेव्हा जीवाची पर्वा न करता हे कोरोना योद्धा त्यांच्यावर उपचार करीत होते. वेळ पडल्यास २४ तास कर्तव्य बजावत होते आणि आजही बाजवत आहेत. सतत कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यामुळे काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाचीही बाधा झाली; मात्र प्रशासनाने त्यांना पगारी रजा दिली नाही. जेवढे दिवस ते गैरहजर होते तेवढ्या दिवसांचा पगार कापला. 

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने संकटात काम करणाऱ्या या कोरोना योद्धयांची आरोग्य विभागाला गरज उरलेली नाही. ज्या ठिकाणी एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी मिळत आहेत त्या ठिकाणच्या सदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना काम थांबविण्याचे आदेश आरोग्य विभाग देत आहे. अन्य जिल्ह्यात या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा थांबवली आहे. रत्नागिरीत काही वैद्यकीय अधिकाऱ्यांवर ही वेळ आली. शासन टप्प्याटप्प्याने त्यांना कमी करणार असल्याचे समजते.  या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कमी न करता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे; मात्र ३ महिने त्यांना पगार देण्यात आलेला नाही.