शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावरील 50 लाख पाण्यात 

कुत्र्यांचे निर्बिजीकरण ठरले कुचकामी; मोहीम थांबवणार 

रत्नागिरी:- शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण (नसबंदी) कुचकामी ठरत आहे. पालिकेने यावर आतापर्यंत सुमारे ५० लाख रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेऊन मार्गदर्शन करावे, अशा प्रकारची चर्चा रनपच्या सर्वसाधारण सभेत झाली.  

नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या वेळी विषय पत्रिकेवरील सात विषयांवर चर्चा करण्यात आली. शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करणे आणि त्यासाठी जागा निश्चिती करण्याबाबतचा विषय सुरवातीलाच चर्चेला आला. मात्र याबाबत नगराध्यक्ष बंड्या साळवी व इतर सदस्यांनी या नसबंदीचा काहीच फायदा होत नसल्याचे सभागृहापुढे मांडले. भटक्या कुत्र्यांना उचलून त्यांची नसबंदी करून पुन्हा त्याच ठिकाणी त्याला सोडले जाते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. कुत्र्यांचा उपद्रव कायम आहे. आतापर्यंत या निर्बिजीकरणावर पालिकेने ५० लाखाच्यावर पैसे खर्च केले आहेत. तरी त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. त्यामुळे आता निर्बिजीकरण मोहीम बंद करण्याबाबत सर्वांचे एकमत झाले. पुढील उपाययोजनेबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेण्यात आला.    

पालिकेने मोकाट गुरांवर कारवाई करून गुरं पकडून ती कोंडवाड्यात ठेवण्यात आली आहेत; मात्र त्यापैकी दंड भरून गुरं सोडवून नेण्यात न आल्याने ४८ गुरे पालिकेच्या कोंडवाड्यात आहेत. ही गुरे विश्व हिंदू परिषदेला  संगोपनासाठी निःशुल्क देण्यास आजच्या सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच कोलकत्ता येथील एस. बी. नंबरींग वर्क प्रा. लि. कंपनीला महाराष्ट्रात इमल्यांना (घरांना) नंबर प्लेट बसवण्याबाबत सर्व पालिकांना पत्र दिले आहे. याबाबत सभेत चर्चा करण्यात आली; मात्र पालिकेने यापूर्वीच शहरातील सुमारे २८ हजार ८८ घरांना नंबर प्लेट दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा त्याची गरज नसल्याचे कंपनीला कळवण्याचा निर्णय घेतला.