आंबा पिकाचा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत समावेश

रत्नागिरी:- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निश्चित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत 2021-22 आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 141 प्रक्रिया उद्योजकांना लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी नवीन उद्योग उभारू इच्छिणार्‍या किंवा सध्या असलेल्या उद्योगाचं विस्तारीकरण वा आधुनिकीकरण करू इच्छिणार्‍यांना अर्ज करता येणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

आत्मनिर्भर भारत पॅकेजमहधून सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना केंद्र सरकारने राबविण्याचे निश्‍चित केले आहे. ही योजना 2020-21 ते 24-25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबवायची आहे. असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांना आर्थिक बळ देऊन त्यामधून रोजगार निर्मितीचा हा प्रयत्न आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात उत्पादीत होणार्‍या मालावरील प्रक्रिया उद्योगांना चालना दिली जाणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून आंबा या पिकाची निवड केली गेली आहे. यामध्ये नवा उद्योग उभारायचा असल्यास तो केवळ आंबा प्रक्रिया उद्योग असणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यांना बँक कर्जाशी निगडित एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के आणि जास्तीत जास्त 10 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यातून लाभार्थ्यांना उद्योगासाठी लागणारे भांडवली खर्च भागवता येऊ शकतात. यासाठी इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करावायाचा आहे. रत्नागिरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून याची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेचा लाभ वैयक्तिक पातळीवर किंवा गट स्वरूपातही घेता येऊ शकेल. अर्ज सादर करणं, सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करणं, कर्ज मंजुरीसाठी बँकेकडे पाठपुरावा करणं अशा विविध कामांमध्ये इच्छुक लाभार्थ्यांना साह्य करण्यासाठी जिल्हास्तरावर चार संसाधन व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. आनंद तेंडुलकर, अमर पाटील, उन्मेश वैशम्पायन, शेखर विचारे यांचा समावेश आहे.