सप्तलिंगी नदीत तिघे चाकरमानी बुडाले; एकाचा मृत्यू एक बेपत्ता तर एकाला वाचविण्यात यश

रत्नागिरी:- देवरुख येथील सप्तलिंगी नदीपात्रात तिघेजण बुडल्याची दुर्घटना घडली. नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी एका प्रौढाचा बुडून मृत्यू झाला आहे. तर यातील एक तरुण तरुण बेपत्ता असून 15 वर्षीय युवकाला वाचविण्यातव ग्रामस्थांना यश आले आहे.ही घटना देवरुख नजीकच्या पूर झेपलेवाडी येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गणेशोत्सवात मौजमजा लुटण्यासाठी पूर झेपलेवाडी येथील काही चाकरमानी गावाकडे आले आहेत. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काही चाकरमानी व गावातील स्थानिक तरुण असे सुमारे दहा जण मिळून सप्तलिंगी नदीपात्रातील जांभळीचे उतरण या ठिकाणी पोहोण्यासाठी गेले होते.

हे ठिकाण वस्तीपासून 3 मिनिटाच्या अंतरावर आहे. गेली चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सप्तलिंगी नदी दुथडी भरून वाहत आहे. 10 तरुणांपैकी तिघांनी प्रथम होण्यासाठी नदीपात्रात झेप घेतली. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. ही बाब नदीकिनारी असणाऱ्या तरुणांच्या लक्षात येताच बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. यातील अशोक सोनू झेपले व हर्ष संजय घाटकर यांना वाचवण्यात यश आले आहे. हा प्रकार ग्रामस्थांना समजतात ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

अशोक झेपले व हर्षद घाटकर यांना उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय सूत्रांनी तपासणी केल्यानंतर अशोक झेपले यांना मृत घोषित करण्यात आले. हर्ष घाटकर याच्यावर उपचार सुरू आहेत. अशोक झेपले यांना मृत घोषित करताच पत्नी व मुलीने रुग्णालयात फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात अशोक झेपले यांच्या शवाचे विच्छेदन करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्यासह पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष सरडकर, किशोर जोयशी, जावेद तडवी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला. पोहण्यासाठी गेलेल्यांपैकी संजय सिताराम घाटकर हे बेपत्ता झाले असून ग्रामस्थ त्यांचा शोध घेत आहेत. शोध मोहिमेत ग्रामस्थांना बरोबरच देवरुख येथील राजू काकडे हेल्प ॲकॅडमी चे कार्यकर्ते व देवरुख घोरपीवाडीतील पोहण्यात तरबेज तरुण सहभागी झाले होते. येथील संपूर्ण नदी परिसर पिंजून काढण्यात आला. सायंकाळी सात वाजेपर्यंत ही शोध मोहीम सुरू होती.

या दरम्यान संजय घाटकर हे मिळून आले नाहीत. काळोख पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली या दुर्दैवी घटनेमुळे झेपले वाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे