गणपती विसर्जनाची जबाबदारी ‘त्या’ तिघींनी आपल्या डोक्यावर पेलली 

रत्नागिरी:- श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत गणेश मुर्ती डोक्यावरुन नेत रत्नागिरी तालुक्यातील पन्हळीतील तिघी मुलींनी ‘हम भी कुछ कम नही’ चा संदेश दिला आहे. मंगळवारी (ता. 14) गौरी-विसर्जनामध्ये त्या तिघींनी सुमारे एक किलोमीटरच अंतर लिलया पार पाडले. कुटूबियांसह ग्रामस्थांनीही पाठबळ देत त्यांचा उत्साह वाढविला.


कोरोना महामारीतील परिस्थितीतही यंदाचा गणेशोत्सव कोकणवासीयांनी उत्साहात साजरा केला. आगमनापासून ते विसर्जन मिरवणुकांपर्यंत गणेशभक्तांनी गतवर्षीची कसर भरुन काढली. वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात तरुणाई पुढे होती. रत्नागिरी तालुक्यातील पन्हळी येथील नेहा वसंत ठीक, प्रणाली चंद्रकांत बैकरसह मयुरी मनोहर किंजळे या तरुणींनी घरातील दीड ते दोन फुटाच्या गणेश मुर्ती डोक्यावर घेत मिरवणुकीत सहभाग घेतला. मुर्ती डोक्यावरुन नदीपात्रापर्यंत चालण्यासाठी तेवढीच क्षमताही लागते. पण पन्हळीच्या तिघी रणरागिणींनी हे आव्हान लिलया पेलले. यातील प्रणाली बैकर यांनी गतवर्षीपासून कुटूंबातील ज्येष्ठांच्या परवानगीने गणपती विसर्जनाचा मान आपल्या शिरी घेतला होता. तिच्याच पावलावर पाऊल टाकत नेहा आणि अन्य एका मुलीने यंदा मिरवणुकीत सहभाग घेतला. जगावेगळे धाडस करणार्‍या या तिघींच्या मागे बैकर, ठिक कुटूंबेही उभी होती. पन्हळी गावातून विसर्जन घाट एक किलोमीटर अंतरावर आहे. पारंपरिक वाद्याच्या गजरात उत्साहात ही मिरवणुक मंगळवारी सायंकाळी सुरु झाली. सुमारे एक तास त्या तिघी रणरागिणी डोक्यावर गणपती घेऊन नदीपात्रापर्यंत चालत होत्या. गणशोत्सावमध्ये पुजेची तयारी करण्याची जबाबदारी महिलांकडे असते. आपसुकच मुर्ती घरी घेऊन येण्यापासून ते विसर्जनापर्यंत ताकदीच्या कामे पुरुषच पार पाडतात. सध्या कमी उंचीच्या आणि कमी वजनाच्या मुर्त्यांमुळे त्या योग्य पध्दतीने नेणे शक्य होते. या परिस्थिती मुलींही या जबाबदारी घेऊन पुढे येत आहेत. पन्हळीतील त्या दोघींनी हा संदेश सर्वांपुढे ठेवला आहे.