मच्छीमारांच्या वाटेतील विघ्न कायम; दर्या खवळलेला, बोटी बंदरातच 

रत्नागिरी:- वार्‍याचा वेग वाढल्यामुळे समुद्र खवळला असून वादळाची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मच्छीमारीला बे्रक लागला असून पर्ससिननेट, ट्रॉलिंगसह गिलनेटधारक मच्छीमारांनी नौका बंदरात उभ्या करणे पसंत केले आहे. काही नौकांनी सोमवारी मासेमारीला जाण्याचा प्रयत्न केला; मात्र वातावरण बदलल्यामुळे माघारी परतावे लागले.

ट्रॉलिंग, गिलनेटसह होडक्याद्वारे मासेमारी करण्यास ऑगस्ट मध्ये परवानगी मिळाली होती. त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पर्ससिननेटला सुरवात झाली; परंतु पावसाळी वातावरण आणि अचानक आलेल्या वादळांमुळे समुद्र खवळलेलाच होता. पर्ससिननेटवाल्यांना मासेमारी जाणेचे धोकादायक होते. पुन्हा वातावरण निवळल्यामुळे चार दिवस मासेमारी करण्यास मिळाले. पण गणेशोत्सवाच्या तोंडावर पुन्हा मुसळधार पाऊस आणि किनारपट्टी भागात वेगवान वार्‍यांना सुरवात झाली. अजुनही मासेमारीत खंड पडलेला आहे. गेले दोन दिवस समुद्र खवळलेला असल्यामुळे एकही मच्छीमारी नौका समुद्रात जाऊ शकलेली नाही. आठ दिवसांपुर्वी छोट्या मच्छीमारांना गणपतीपुळेजवळ व्हाईट चिंगळं जाळ्यात सापडत होती. साखरतर, वरवडे, काळबादेवी, मिर्‍या येथील सुमारे शंभरहून अधिक गिलनेट धारक मच्छीमारांनी चिंगळांवर उडी मारली. व्हाईट चिगळांना 500 रुपये किलो तर टायनीला 200 रुपये किलोपर्यंत दर मिळाला. तसेच पर्ससिननेटला सुरवातीला पेडवा, गेदर 50 ते 60 डिश (एका डिशमध्ये 32 किलो) मिळत होते. पेडवाला डिशला 700 रुपये तर गेदरला डिशला 1500 ते 1700 रुपये दर होता. या आठवड्यात वेगवान वारे आणि पाऊस पडत आहे. परिणामी समुद्राच्या पाण्याला करंट असून मोठ्या लाटा आहेत. त्यावर नौका उभ्या करणेही शक्य नाही. मासेही खोल समुद्रात जातात. या परिस्थितीत मासेमारीला जाणे धोका पत्करण्यासारखेच आहे. पर्ससिननेटसह अन्य सर्व मच्छीमारांनी नौका बंदरातच उभ्या केल्या आहेत. त्यामुळे पन्नास ते साठ लाखाचा फटका मच्छीमारांना बसला आहे. सोमवारी सकाळी वार्‍यांचा वेग कमी असल्यामुळे काही ट्रॉलिंगवाल्यांनी चालू चिंगळांसाठी धोका पत्करला होता. चालू चिंगळं काही प्रमाणात मिळत असून किलोला 220 रुपये दरही आहे. दुपारनंतर पुन्हा वारे वाढल्यामुळे मच्छीमारांनी जवळच्या बंदरांचा आसरा घेतला. सायंकाळनंतर मच्छीमारीला पूर्णतः ब्रेक लागला होता.