जिल्ह्यात गौरी-गणपतीला शांततेत निरोप

रत्नागिरी:- पावसाच्या सरींचा सामना करत जिल्ह्यात गणेश भक्तांनी पाच दिवसांच्या गौरी-गणपतींचे विसर्जन केले. गणपती बाप्पा मोरया….पुढच्या वर्षी लवकर या… चा जयघोष करत जिल्ह्यात 19 सार्वजनिक तर 1 लाख 17 हजार 213 खासगी गणेशमुर्तींना निरोप देण्यात आला. गावागावात पारंपरिक वाद्यांच्या गजरात नदी किनार्‍यांसह समुद्र किनार्‍यावर विसर्जनासाठी गणेशभक्त सरसावले होते.

यंदाच्या गणशोत्सवावर कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रभाव होता; मात्र गणेशभक्तांनी त्यावरही मात करुन आनंदात उत्सव साजरा केला. सकाळपासून विसर्जनाची जोरदार तयारी सुरु होती. सकाळच्या सत्रात पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र दुपारनंतर उघडीप दिली. सायंकाळी हलक्या सरी पडू लागल्या आणि गणेशभक्तांची तारांबळ उडाली. दिवसभर विसर्जनावर पावसाचे सावट होते. त्या परिस्थितीत गणशमुर्तींवर प्लास्टीकचे आवरण टाकून विसर्जन मिरवणुका सुरु झाल्या. रस्त्यांवरुन, पायवाटांवरुन मार्गक्रमण करत या डोक्यावर मुर्ती घेतलेले भक्त गणरायाचा जयघोष करत होते. दुपारनंतर विसर्जन घाटांवर आरत्यांचे सूर घुमत होते. पावसाच्या सावटामुळे अनेकांनी घाई करत विसर्जनावर भर दिला होता. खेडमध्ये जगबुडी, चिपळूणात वाशिष्ठीसह संगमेश्‍वरात गडनदी, बावनदी तर रत्नागिरी शहरात भाट्ये आणि मांडवीत विसर्जनाला भक्तगणांची गर्दी होती. सायंकाळी पावसाच्या सरींमुळे गणेशभक्तांची तारांबळ उडाली होती. मांडवी व भाट्ये येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. कोरोनामुळे गर्दी होऊ नये यासाठी गणपतीबरोबर पाच माणसांनाच परवानगी होती. जेटीवर जाण्यास मनाई केली होती. निर्माल्य संकलनासाठी पालिकेकडून पथके नियुक्ती केलेली होती.