फेरीवाल्यांचे वजन काटे जप्त; रनपची अनोखी शक्कल 

रत्नागिरी:- शहरातील बाजारपेठ परिसरासह काही ठिकाणी फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यासाठी रत्नागिरी पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. फेरीवाल्यांकडील मालापेक्षा वजन काटे जप्त करण्याची नवीन शक्कल लढवली. गेल्या दोन दिवसात पालिकेने आठ ते दहा जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून पाचशे रुपयांप्रमाणे दंड वसूल केला आहे.

गणेशोत्सवासाठी फळं, भाजीपाला यासह विविध आवश्यक साहित्यांच्या विक्रीसाठी अनेक फेरीवाले शहरात स्टॉल लावून बसतात. मारुतीमंदिर, जेलनाका, रामआळी, गोखले नाका, विठ्ठल मंदिर परिसरासह धनजी नाका येथे बर्‍यापैकी फेरीवाल्यांची गर्दी होते. हातगाडीवरुन फळं विकणारे रामआळी परिसरात जागा अडवून उभे राहत असल्याने वाहतुक कोंडी होते. पादचार्‍यांना चालणेही कठीण होते. याबाबत नागरिकांकडूनच पालिकेकडे तक्रारी येत होत्या. जेलनाका परिसरात तर फेरीवाल्यांमुळे वाहनचालकांची मोठी गर्दी होत होती. शहरातील मुख्य मार्गावर ही परिस्थिती असल्यामुळे अपघात होण्याची शक्यतानाही नाकारता येत नव्हती. अनधिकृतरित्या स्टॉल लावणार्‍यांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यासाठी दिवसातून तिनवेळा पालिकेची जप्तीची गाडी फिरवण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत कारवाई करताना पालिकेकडून फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करुन आणले जात होते. यामध्ये मालाची हानी होते आणि त्याचे नुकसान संबंधिताला होते. फेरीवाल्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी या उद्देशाने पालिकेकडून फेरीवाल्यांचे वजनकाटे जप्तीचा फंडा अवलंबण्यात आला आहे. वजनकाट्याशिवाय ते विक्री करु शकत नाही. तसेच फळांची विक्री अशीच केली गेली तर वजन काटे विभागाकडूनही त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. हे लक्षात घेऊन दंड भरुन वजन-काटे मिळवण्यासाठी फेरीवाले पालिकेकडे धाव घेतात. सध्या जेलनाका परिसरात एकही फेरीवाला दिसणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात दहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दंडही वसूल केला आहे. जेलरोडपासून माळनाक्यापर्यंत दोन्ही बाजूला सहा फेरीवाले कायमस्वरुपी बसत होते. त्यांना तेथून हटविण्यात आले असून ते पुन्हा बसणार नाहीत याची व्यवस्था करण्यात आली आहे.