परळ दापोली एस.टी.ला म्हाप्रळ येथे अपघात; 4 जण जखमी

मंडणगड:- परळ येथून दापोलीकडे परतीचा प्रवास करणाऱ्या परळ दापोली एस.टी.ला काल 5 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 डीडीवर म्हाप्रळ (रोहीदासवाडी) येथे अपघात झाला. अपघातात गाडीच्या चालकासह चार प्रवाशांना दुखापत झाली त्यांच्यावर मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन दापोली येथे पाठवण्यात आल्याची माहीती आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

गाडीचे चालक प्रभाकर माधवरा घुगे वय (31) यांनी मंडणगड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीतील माहीतीनुसार हे आपल्या ताब्यातील परळ-दापोली गाडीने (MH.20 BL. 3269) ने दापोली प्रवासाकरिता परळ येथून रात्री 11 वाजता मार्गस्थ झाले. वाटेत वरील मार्गावर प्रवास करीत असताना समोरुन येणाऱ्या चारचाकी वाहनाने हुलकावणी दिल्याने व रस्त्यावरील खड्डे वाचवण्यासाठी अचानक ब्रेक मारल्याने फिर्यादी यांनीही गाडीला ब्रेक मारला. यावेळी गाडी डाव्याबाजूला रस्तालगत कलंडून अपघात झाला. यावेळी गाडीत एकूण 23 प्रवाशी प्रवास करीत होते. अपघातानंतर जखमींवर मंडणगड येथे प्रथमोपचार करुन अधिक उपचारासाठी दापोली येथे पाठवण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदार यांच्या गलथान कारभारामुळे चिंचाळी ते म्हाप्रळ या गावांचे हद्दीत रस्त्याची दुरावस्था झालेली असून समस्याकंडे पुर्ण पावसात दुर्लक्ष केलेल्या प्राधिकऱणाने वाढत्या जनक्षोभामुळे गणपतीचे आधी माती व दगड टाकून खड्डे बुजवण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न समस्या कमी करण्याचे ऐवजी त्यात भर टाकत आहे. रस्त्यावरून दुचाकी तीन चाकी व लहान चार चाकी वाहनांच्या लहान मोठ्या अपघातांची मालीका थांबलेली नाही त्यात आज एस.टी. भर पडली आहे. गणशोत्सवासाठी मंडणगड व दापोली तालुक्यात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांचे चिखलाने स्वागत करण्याची पक्की तयारी प्राधीकरणाने केलेली असताना एस.टी.चा अपघात समस्येची तीव्रता आणखीन अधोरेखीत होत असताना गलथान कराभारासाठी प्रसिध्द असलेले प्राधिकरण आता तरी लक्ष देणार का? असा प्रश्न या निमीत्ताने पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.