गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष पॅसेंजर रेल्वे धावणार 

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव कालावधीत पूर्ण आरक्षित अशा पॅसेंजर सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. रत्नागिरी-दिवा आरक्षीत पॅसेेंजरसह दिवा-सावंतवाडी, आणि रत्नागिरी – मंडगाव या गाड्यांचा समावेश आहे. पॅसेंजर गाड्या सिटींग आरक्षणाच्या असून ७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत धावतील. त्यामुळे कोकणात येणार्‍या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा कोरोना परिस्थिती नियंत्रणात असली तरीही तिसर्‍या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई आणि परिसरातील चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या गावाकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्यांचे आरक्षण १२० दिवसापूर्वी पूर्ण झाली आहे. तर जून महिन्यापासून गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या विशेष उत्सव गाड्यांचे आरक्षणही पूर्ण झाले आहे. त्यामुळे तीनशे ते साडेतीनशे प्रतीक्षा यादीवर असलेल्या मुंबईच्या चाकरमान्यांना कोकण रेल्वेने दिलासा दिला आहे. या गणेशोत्सवात ७ सप्टेंबर पासून पॅसेंजर गाड्या सोडल्या जाणार आहेत. दिवा ते सावंतवाडी, दिवा ते रत्नागिरी आणि रत्नागिरी- मंडगाव या पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहेत. या पॅसेंजर गाड्या कोकणातील सर्व रेल्वे स्थानकांवर थांबणार आहेत. तसेच नव्या स्वरूपातील लाल रंगाच्या एलबीएच कोच असलेल्या या गाड्या सोडल्या जाणार आहेत. मात्र आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच यामधून प्रवास करता येणार आहे.