कोरोना काळातील थकीत घरपट्टी वसुलीचे पालिकेसमोर आव्हान 

6 कोटींची थकबाकी; दरदिवशी पाचशेजणांना नोटिसा बजावणार 

रत्नागिरी:- दीड वर्षांच्या कोरोना काळाने घरपट्टी वसुलीचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. १४ कोटी उद्दीष्ट असताना फक्त ८ कोटी वसूल झाले आहेत तर ६ कोटी थकीत आहेत. थकबाकी वसुलीसाठी पालिकेने जादा कर्मचारी कामाला लावून साडेचौदा हजार इमलेधारकांना घरपट्टीची नोटीस देण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी दरदिवशी ५०० घरांना नोटीस बजावण्याचे, चिकटवण्याचे टार्गेट या कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाने दिले आहे. सुमारे १ कोटी काही बुडीत कंपन्यांची थकबाकी असल्याचे सांगण्यात आले. 

पालिकेला मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या घरपट्टी वसुलीचे मोठे आव्हान आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाची घरपट्टी वसुलीची मोहीम आता सुरू आहे; मात्र वर्ष संपायला आले तरी त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. कोरोनामुळे घरपट्टीचे उद्दीष्ट वाढून १४ कोटी झाले आहे. त्यापैकी ८ कोटी वसूल झाले असून ६ कोटी थकीत आहेत. त्यासाठी मालमत्ता विभाग फिरत असला तरी अनेकांना थकीत घरपट्टीची नोटीस मिळालेली नाही. प्रत्यक्ष नोटीस गेल्यास वसुलीला प्रतिसाद मिळण्याच्या शक्यतेने नराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी मालमत्ता विभागाला कामाला लावले आहे.

सहा कोटींची थकबाकी असली तरी थकीत इमलेधारकांना नोटीस देऊन त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे. त्यासाठी मालमत्ता विभाग आणि शिपाई यांच्यामार्फत नोटीस बजावण्यात किंवा चिकटवण्यात येणार आहे. इमलेधारकांनी वेळीच थकीत घरपट्टी न भरल्यास जप्तीसारखी कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पालिकेने दिला. शहरातील संचयनीसह अनेक बुडीत निघालेल्या कंपन्यांची १ कोटीची थकबाकी आहे.