गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी रनपचा विशेष प्लॅन 

रत्नागिरी:- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर रत्नागिरी नगर परिषदेने रस्ते, पाणी, स्वच्छता या बाबींकडे विशेष लक्ष केंद्रीत केलेले असल्याचे नगराध्यक्ष पदीप उर्फ बंड्या साळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोनामुळे होणारी गर्दी लक्षात घेता यावर्षीही शहरात 4-5 ठिकाणी कृत्रिम गणपती विसर्जन तलाव तयार केले जाणार आहेत. गणपती विसर्जनाच्या मदतीसाठी न.प.ची खास 3 वाहने सज्ज ठेवण्यात येणार आहेत. 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर परिषदेतील सर्व विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक यांची नुकतीच केल्या जाणाऱ्या उपाययोजना आखण्यासाठी बैठक पार पडली. या बेठकीला नगराध्यक्ष बंड्या साळवी, बांधकाम समिती सभापती तथा गटनेते राजन शेट्ये, आरोग्य समिती सभापती निमेश नायर तसेच सर्व नगरसेवकांचीही उपस्थिती होती. गणेशोत्सव काळात शहरातील मुख्य समस्या असलेल्या रस्ते दुरूस्ती, स्ट्रीट लाईट दुरूस्ती, पाणी पुरवठा नियोजन, स्वच्छता यांवर चर्चा होउन त्याबाबत नियोजन आखण्यात आले. येत्या 5 सप्टेंबरपर्यंत स्ट्रीट लाईट, रस्त्यांकडेच्या झाडी, गवताची साफसफाई केली जाणार आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सद्या वेगाने हाती घेण्यात आलेले आहे. गणपतीपूर्वी हे खड्डे बुजविण्याकडे लक्ष दिले जाणार आहेत. साळवी स्टॉप ते मांडवीपर्यंतचा मुख्य रस्त्यांचेही त्याचबरोबर गणेश विसर्जन असलेले मार्ग देखील खड्डे पॅचिंग केले जाणार आहेत.  

शहरातील पाणीपुरवठा गणेशोत्सव काळात सुरळीत राहण्यासाठी लक्ष दिले जाणार असल्याचे साळवी यांनी सांगितले. गणेश विसर्जनासाठी माळनाका, मांडवी, नरहर वसाहत अशा 4-5 ठिकाणी कृत्रीम विसर्जन तलावांची निर्मिती केली जाणार आहे. त्याठिकाणी नागरिकांना आपल्या गणपती मुर्त्यांचे विसर्जन गर्दी टाळून करता येणार असल्याचे सांगण्यात आले. शहरातील नागरिकांसाठी कोरोनाच्या अनुषंगाने घरगुती गणेश विसर्जनासाठी 3 वाहने नगर परिषदेमार्पत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. जर कुणा नागरिकांना गणेशविसर्जन करणे शक्य होणार नाही, अशावेळी वाहनाची गरज लागल्यास नगर परिषदेमार्पत ही वाहने उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नागरिकांसाठी संपर्क  क्रमांक उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सांगितले.