भाजप नेते प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल 

रत्नागिरी:- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्यासह चार जणांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्वर येथे अटक झाल्यानतर त्यांची थांबलेली जन आशिर्वाद यात्रा शुक्रवारी रत्नागिरीतून पुन्हा सुरु झाली. ना. नारायण राणे यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर मोठ्या जल्लोषात जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. शिवसेना भाजप मधील वाढलेला तणाव आणि त्यातच कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने प्रशासनाने निर्बध घातले होते.मात्र या निर्बंधना धुडकावून लावत मोठ्या जल्लोषात भाजपची जन आशिर्वाद यात्रा रत्नागिरीत पार पडली. यावेळी मोठी गर्दी उसळली होती. त्यातच प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी आयोजकांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

याबात पोलीस पोहवा महेश अरविंद कुबडे यांनी तक्रार दिली आहे या तक्रारीत असे नमूद केले आहे की, भाजपा पक्षाचे वतीने ना. नारायण राणे यांची जन आशिर्वाद यात्रा कार्यक्रम रत्नागिरी येथे होणार असल्याने शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाम. नारायण राणे यांचे हॅलीकप्टरने रत्नागिरी विमानतळ येथे आगमन झाले. त्यानंतर तेथुन ते त्यांचे ठरल्या, कार्यक्रमाप्रमाणे वाहनांच्या ताफ्यातून मारुती मंदीर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकास माल्यार्पण करण्यासाठी 11.00 या आले असता तेथे भारतीय जनता पक्षाचे 90 ते 100 कार्यकर्ते जमवुन तोंडावर मास्क न वापरता तसेच सामाजिक अंतर न ठेवता कोरोना विषाणु या साथिचे रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव आहे हे माहीत असताना देखील आपल्यापासुन दुस-यांना व दुस-यांपासुन इतरांच्या जीवीतास कोरोना विषाणुचा धोका होईल अशी कृती करुन प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले .

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशिर्वाद यात्रेचे रत्नागिरी येथील कार्यक्रमात कोरोना विषाणु या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होईल हे माहीत असताना देखील मास्कचा वापर न करता, सोशल डिस्टंस न ठेवता प्रशासनाच्या नियमावलीचे उल्लंघन केल्या प्रकरणी माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाअध्यक्ष दिपक पटवर्धन, संकेत बावकर, प्रफुल्ल पिसे यांचे विरुध्द सरकारतर्फे भा.दं.वि.सं.का.क. 269,34 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37 ( 1 ) ( 3 ) चे उल्लंघन कलम 135  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोहेकों  कोकरे हे करीत आहेत