गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर आणखी ६३ गाड्या धावणार 

रत्नागिरी:- गणेशोत्सवाला कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी ६३ गाड्या  सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांमध्ये एलटीटी- रत्नागिरी, नागपूर- करमळी, एलटीटी- सावंतवाडी, पनवेल- सावंतवाडी, पनवेल- चिपळूण, दादर- रत्नागिरी आणि दादरमंगलुरू या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या ४ ते १५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत धावणार आहेत.

एलटीटी-रत्नागिरी गाडी १० सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजून ३३ मिनिटांनी सुटेल आणि दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी रत्नागिरीत पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ती गाडी दुपारी एक वाजून २० मिनिटांनी रवाना होईल. ती रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी एलटीटीला पोहोचेल.

नागपूर-करमळी आणि परत ही गाडी नागपूरहून ४ आणि ११ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी सव्वादोन वाजता पोहोचेल. ही गाडी ५ आणि १२ सप्टेंबर रोजी रात्री सव्वाआठ वाजता परतीच्या प्रवासाला निघेल. चोवीस तासांनी ती नागपूरला पोहोचेल.एलटीटी-सावंतवाडी मार्गावरील गाडी ४ ते १४ सप्टेंबर या काळात दर शनिवार, मंगळवार आणि गुरुवारी सकाळी दहा वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि रात्री दहा वाजून ५० मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी ६ ते १५ सप्टेंबर या काळात दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी ती एलटीटीला पोहोचेल.पनवेल-सावंतवाडी मार्गावर ५ ते १५ सप्टेंबर या काळात दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी सुटणारी विशेष गाडी रात्री दहा वाजून ५० मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ती गाडी ४ ते १४ सप्टेंबर या काळात दर शनिवार, रविवार, मंगळवार आणि गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वादहा वाजता पनवेलला पोहोचेल.

पनवेल-चिपळूण-पनवेल मार्गावरची जादा गाडी ४ ते १५ सप्टेंबर या काळात दररोज सकाळी आठ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल आणि दुपारी अडीच वाजता चिपळूणला पोहोचेल. त्याच दिवशी दुपारी तीन वाजून ५ मिनिटांनी परतीच्या प्रवासाला ही गाडी निघणार असून ती रात्री साडेआठ वाजता पनवेलला पोहोचेल.दादर-रत्नागिरी-दादर या मार्गावरील विशेष गाडी ४, ५, ६ आणि ९ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वाआठ वाजता दादरहून निघेल आणि सायंकाळी चार वाजून ५० मिनिटांनी रत्नागिरीला पोहोचेल. त्याच दिवशी ही गाडी सायंकाळी पावणेसहा वाजता परतीच्या प्रवासाला निघेल आणि मध्यरात्रीनंतर पाऊण वाजता दादरला पोहोचेल.

सातवी विशेष गाडी दादर ते मंगलुरु जंक्शन या मार्गावर १० सप्टेंबर या एकाच दिवशी धावणार असून ती सकाळी सव्वाआठ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता ती पोहोचेल. या सर्व सातही गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार आहेत.