कुटुंबाच्या जीवाला धोका; वरवडेतील केशव पोवार यांची कोकण आयुक्तांकडे धाव

रत्नागिरी:- कुटुंबाला वाळीत टाकल्याची तक्रार करूनही जयगड पोलीस स्थानकात दखल घेण्यात आलेली नाही. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे न्याय मागितला होता. आता वरवडे येथील ग्रामस्थ केशव पोवार यांनी अखेर कोकण आयुक्त यांच्याकडे धाव घेत कुटुंबाचे रक्षण करण्याची मागणी केली आहे.  

वरवडे-भंडारवाडा-खारवीवाडा-फिरार कम्युनिटी असा रस्ता बांधण्याचे काम काही महिन्यांपासून सुरु होते. हा रस्ता बांधणीच्या कामावरुन गावात एकमत होत नव्हते; परंतु गावातील सर्व लोकांशी सलोख्याचे संबंध असल्यामुळे कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रकार केला गेला.
 

या अन्याया विरोधात 30 जुलैला पोवार यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता; परंतु त्यावर न्याय दिला गेला नाही. उलट गावातील लोकांकडून धमक्या मिळत आहेत. गावातील काही स्थानिक पुढारी सेनेतील राजकीय संबंधाचा गैरवापर करुन कुटुंबाला त्रास देत आहेत असा आरोप पोवार यांनी केला आहे. 

जयगड पोलिसांकडून केवळ चौकशीचा फार्स केला. जयगड पोलिसांनी आरोपीना अभय दिल्याने कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण झाला असून यामुळे कुटुंबातील प्रत्येकाला दबावाखाली जीवन जगावे लागत आहे असे पोवार यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे देखील दाद मागण्यात आली मात्र न्याय मिळावा नाही यामुळे पोवार यांनी अखेर कोकण आयुक्त यांच्याकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांची शुक्रवारी भेट घेऊन दाद मागणार असल्याचे पोवार यांनी सांगितले.