जिल्ह्याच्या मत्स्योत्पादनात 799 मेट्रीक टनाची घट

रत्नागिरी:- जिल्ह्याच्या मत्स्योत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत 799 मेट्रीक टन इतकी घट झाली आहे. 2020-2021 या आर्थिक वर्षात मासळीचे उत्पादन 65 हजार 374 मेट्रिक टन मिळाले आहे. दोन वर्षांपुर्वीच्या तुलनेत यंदाची घट कमी आहे.

जिल्ह्याला 167 किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. या क्षेत्रात 13 मासेमारी केंद्रे असून, किनार्‍यावर असलेल्या 104 गावांमध्ये बहुसंख्य मच्छिमार लोकच राहतात. जिल्ह्यात 2003 च्या गणनेनुसार मच्छिमारांची संख्या 67,615 आहे. जिल्ह्यात 3,077 यांत्रिकी नौका, 442 बिगर यांत्रिकी नौका, 46 मासळी उतरविण्याची केंद्रे, 85 मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, 34 बर्फ कारखाने आहेत. हजारो कोटी रुपयांची उलाढाल मत्स्योत्पादनातून होते; मात्र मागील दहा वर्षाची आकडेवारी पाहीली तर सातत्याने मत्स्योत्पादन कमी होत आहे. 2014-15 मध्ये मत्स्य उत्पादन 1 लाख 15 हजार 42 मेट्रिक टन होते. 2015-16 मध्ये 18 हजार टनांनी घट झाली असून त्यावर्षी 87 हजार 030 मेट्रिक टन उत्पादन झाले. 2016-17 मध्ये 11 टनांनी वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर पुढील चार वर्षांत मत्स्य उत्पादनात सातत्याने घट झाली. त्यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडत आहे.