न्याय न मिळाल्याने वरवडेतील शांताराम पोवार यांची पोलीस अधिक्षकांकडे धाव 

रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे-खारवीवाडी येथील ग्रामस्थांनी वाळीत टाकल्या प्रकरणी केशव शांतराम पोवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे. यापुर्वी जयगड पोलिस ठाण्यात दिलेल्या अर्जावरही योग्य ती कार्यवाही झाली नसल्याचे श्री. पोवार यांनी सांगितले.
याबाबत निवेदन श्री. पोवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले.

वरवडे-भंडारवाडा-खारवीवाडा-फिरार कम्युनिटी असा रस्ता बांधण्याचे काम काही महिन्यांपासून सुरु होते. हा रस्ता बांधणीच्या कामावरुन गावात एकमत होत नव्हते; परंतु गावातील सर्व लोकांशी सलोख्याचे संबंध असल्यामुळे कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रकार केला गेला. या अन्याया विरोधात 30 जुलैला जयगड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता; परंतु त्यावर न्याय दिला गेला नाही. उलट गावातील लोकांकडून धमक्या मिळत आहेत. राजकीय संबंधाचा गैरवापर करुन कुटुंबाला त्रास दिला जात आहे. गावातील श्री सोमजाई मंदीरात यंदा परडी देण्याचा मान असतानाही त्यातून डावलण्यात आले. वाडीतील लोकांनी आमच्या कुटूंबावर बहिष्कार टाकला आहे. याबाबत तक्रार अर्ज दिला आहे. हे करण्यासाठी पुढाकार घेणार्‍या गावातील जबाबदार लोकांवर कारवाई व्हावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.