जिल्ह्यात बहुतांश ग्रामपंचायतींमधील ग्रामसभा रद्दच

रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाचक नियम आणि अटी आणि आयत्यावेळी ऑनलाईन ग्रामसभा घेण्याचे आदेश यामुळे द्विधा मनस्थितीत सापडलेल्या अनेक ग्रामसेवकांनी 15 ऑगस्टच्या ग्रामसभाच घेतल्या नाहीत. 

ग्रामपंचायतींनी वर्षातून चार ग्रामसभा घेण्याचा नियम असून, गेल्या वर्षभरापासून कोरोनाने ठाण मांडल्यामुळे या ग्रामसभांवर गंडांतर आले होते. यंदा मात्र कोरोनाचे रुग्ण काहीसे कमी झाल्यामुळे १५ ऑगस्टला ग्रामसभा घ्यावी की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला असता, जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते.त्यानुसार, कोविड नियम व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या याचा विचार करून, त्या-त्या जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबतचा निर्णय घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार, जिल्हा परिषदेने शुक्रवार (दि. १३) रोजी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून ग्रामसभा घेण्याबाबत कळविले. त्यात प्रामुख्याने ज्या ग्रामपंचायतीत कोरोना रुग्ण नाहीत, तसेच पॉझिटिव्ह रेट कमी आहे, अशा ठिकाणी ग्रामसभा घेण्यात यावी. ग्रामसभा आयोजित करताना मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर याबरोबरच दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. याबरोबरच 2 डोस झालेल्यांना ग्रामसभेत प्रवेश- त्यांची प्रमाणपत्र तपासणी, अँटीजेन चाचणी अशा जाचक नियमांमुळे गावस्तरावर ग्रामसभा आयोजित करणे दुरापास्त झाले होते. गेल्या दिड वर्षात सभा न झाल्याने तसेच जाचक नियमांमुळे ग्रामस्थ, सदस्यांमध्ये नाराजीची शक्यता निर्माण झाली होती. कोरोना चाचण्या, लसीकरण प्रमाणपत्र यासाठी वेगळ्या यंत्रणेची गरज होती. अशा परिस्थितीत ग्रामसभा आयोजित करणे केवळ अशक्य होते.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व ग्रामपंचायतींना प्रशासनाचे आदेश प्राप्त झाले. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत ग्रामसभा घेणे अशक्य असल्याचे कारण पुढे करतानाच जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांचे जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू केले असल्याने ग्रामसभा कशी घ्यावी, असा पेच ग्रामसेवकांना पडला. शिवाय ग्रामसभेसाठी गर्दी झाल्यास कायद्याचा भंग झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित करून तशी विचारणाही ग्रामसेवक संघटनेने प्रशासनाकडे केली असता, ऐनवेळी ऑनलाइन ग्रामसभा घेण्याचे आदेश देण्यात आले. परंतु ग्रामीण भागात तेही अशक्य असल्याने ग्रामसेवकांनी थेट ग्रामसभांवरच फुली मारली आहे.