‘तौक्ते’तील आपद्ग्रस्तांना 14 कोटी 25 लाखाचे वाटप

रत्नागिरी:- मे महिन्याच्या मध्यात झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळातील आपद्ग्रस्तांना आतापर्यंत 14 कोटी 25 लाखाची मदत वाटप करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक नुकसान झालेल्या फळबागायतदारांना 9 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 16 मे रोजी तौक्ते चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकले. वादळाचा केंद्रबिंदू किनारपट्टीपासून 200 किलोमीटर अंतरावर होता. तरीही ताशी 60 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर, गुहागर या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला होता. वेगवान वार्‍यांमुळे फळ झाडे उन्मळून गेली होती. घरा, गोठ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले होते. सुदैवाने जीवीत हानी झालेली नव्हती. पंचनामे झाल्यानंतर महिन्याभरांनी राज्य शासनाकडून मदतीचे निकष जाहीर केले होते. एनडीआरएफच्या निकषात अधिकच्या रकमेची भर घातली होती. अडीच महिन्यांनी शासनाकडून मदतीची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली. त्याचे वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्याला सुमारे 21 कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यातील 14 कोटी 25 लाख रुपये वितरीत केले गेले आहेत. यामध्ये घरे, गोठ्यांच्या नुकसानीपोटी 3 कोटी 84 लाख, फळ बागायतीपोटी 9 कोटी 98 लाख तर मृत पशूधनासाठी 2 लाख रुपये, घरगुती भांडी नुकसानीत 15 लाख रुपये वाटप झाले आहेत. खेड तालुक्यातील मृत पावलेल्या दोघांचा प्रत्येकी चार लाख रुपये देण्यात आले आहेत.