जिल्ह्यात सद्यस्थितीत डेल्टा व्हेरिएंटचा एकही रुग्ण नाही: जिल्हाधिकारी

16 रुग्ण यापूर्वीचे; उपचाराअंती सर्व रुग्ण बरे 

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटचा एकही रुग्ण सध्या नाही. यापूर्वी डेल्टाचे १६ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते ते सर्व रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यात डेल्टाचे रुग्ण सापडत असल्याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल होत होत्या. काही वृत्त वाहिन्यांनी त्याबाबत वृत्त प्रदर्शित केली. जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटचे नवे रुग्ण सापडल्याचे वृत्त येताच जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेत डेल्टाबाबत खुलासा केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्यात डेल्टा प्लसचे ४-८-२०२१ रोजी १६४ सॅम्पल्स पाठविण्यात आले होते. त्यापैकी १५ ऑगस्ट रोजी ३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये २ स्त्रिया व एका पुरुष रुग्णाचा समावेश आहे. हे रुग्ण २१-७-२०२१ रोजी उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर डेल्टाच्या तपासणीकरीता त्यांचे सॅम्पल पाठविण्यात आले होते. आता ते तीनही रुग्ण रुग्णालयात बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

संगेमश्‍वर तालुक्यातील धामणी, आंगवली येथे लसीकरण चांगल्या पद्धतीनेच झाले आहे. दोन्ही गावे कोरोना मुक्त झाली आहेत. डेल्टाचा एक रुग्ण मुंबईत मयत झाला त्याच्या आधार कार्डवर रत्नागिरीचा पत्ता होता. मात्र त्याचे वास्तव्य हे मुंबईतच होते. रत्नागिरीचा पत्ता असल्याने त्याची नोंद रत्नागिरीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या गावात डेल्टाचे रुग्ण सापडले होते त्या गावात आरोग्य विभागामार्फत स्क्रिनिंग करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दर दिवशी ८ ते ९ हजार चाचण्या करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

गणेशोत्सवासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, गणेशोत्सवाबाबत राज्य स्तरावर असलेली कमिटी निर्णय घेईल व त्याची अंमलबजावणी जिल्हास्तरावर केली जाईल. मात्र गणेशोत्सवात येणार्‍या प्रत्येक चाकरमान्याची तपासणी होणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.