निर्बंधांत शिथिलता; बाजारपेठेत रेलचेल वाढली

रत्नागिरी:-जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता मिळाल्याने उपहार गृह, दुकाने, शॉपिंग मॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात आले होते. त्यामुळे सोमवारी ग्राहकांची बाजारपेठेत रेलचेल होती; मात्र एसटी पाऊस आणि वाहतूक बंदचा परिणाम जाणवत होता.

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात 15 ऑगस्टपासून ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी जाहीर केल्या. त्याची अंमलबजावणी खर्‍या अर्थाने आज सुरु झाली. उपहारगृहांसाठी पार्सल सुविधांनाच परवानगी होती. शिथिलतेमुळे ग्राहकांची हॉटेलमधील ये-जा सुरु झाली आहे. पुर्वी दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवली जात होती. त्यामुळे ग्राहक दिवसातच खरेदी आटपून घरी निघुन जात होते. सोमवारी सायंकाळी लोकांची तुरळक गर्दी होती. अनेकांची मानसिकता अजुनही बदलेली नाही. दुकाने उघडी असली तरीही तेवढा ग्राहकवर्ग दिसत नव्हता. एसटी वाहतूक बंद असल्यामुळे सायंकाळच्या सत्रात खरदेसाठी शहरातील नागरिक वगळता अन्य कोणीच नव्हते. बाजारपेठेतील गर्दी वाढण्यासाठी
दहिकाला, गणपतीउत्सवापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. कोरोनामुळे संध्याकाळ उपहार गृहात बसून खाण्याची सवय गेल्या पाच महिन्यात पूर्णतः सुटली होती. शिथिलतेमुळे पार्सल नेणारा ग्राहकवर्ग हॉटेलमध्ये येऊ लागला आहे. रात्री उशिरा जेवणाचा आस्वाद घेण्यासाठीही काहींनी धाव घेतली होती. हा टक्का नेहमीपेक्षा थोडा कमी होता.

दरम्यान, प्रशासनाने दुकाने खुली ठेवण्यासाठी कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण असणे आवश्यक केले आहे. सुपर स्प्रेडर म्हणून बाजारपेठ बंद केली होती. आताही व्यावसायीक आणि कर्मचारी यांच्या लसीकरणासाठी विशेष शिबिराची गरज आहे. तसेच एसटी बंद असल्यामुळे अनेक कामगारांना दुकानात येणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी एसटी प्रशासनाकडून कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे व्यापार्‍यांचे मत आहे.