हंगामाच्या सुरुवातीलाचा मासेमारीला हवामानाचा फटका; केवळ 30 टक्के नौका समुद्रात

रत्नागिरी:- हंगाम सुरु झाल्यानंतर गेल्या पंधरा दिवसात वीस ते तीस टक्केच मच्छीमार धोका पत्करुन समुद्रावर स्वार झाले होते. गिलनेटसह ट्रॉलर्स्ना चिंगळं, बांगड्याचा आधार होता. गेले दोन वेगवान वार्‍यामुळे मच्छीमारीला ब्रेक लागला आहे. आधीच श्रावणामुळे माशांना मागणी कमी झाल्यामुळे बांगड्याचा दर घसरला आहे.

जुलै महिन्यात अतिमुसळधार पावसाने थैमान घातले होते. ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला जोर कमी झाला असला तरीही अधूनमधून वादळी वारे वाहत आहेत. 1 ऑगस्टपासून मच्छीमारीला सुरवात झाली होती. खवळलेला समुद्र, पाण्याचा प्रचंड करंट या परिस्थितीमध्ये बंदी कालावधीतील दोन महिन्याचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी ट्रॉलर्स् आणि गिलनेटवाल्यांनी मासेमारीला सुरु केली. हंगामाच्या सुरवातीच्या पंधरवड्यात गिलनेटवाल्यांना समाधानकारक मासळी मिळत होती. परंतु गेल्या दोन दिवसात वातावरण बिघडल्यामुळे मासेमारीत अडथळे येत आहेत. वेगवान वार्‍यामुळे समुद्रात जाणे अशक्य असल्याचे अनेक मच्छीमारांचे मत आहे. पाण्यालाही करंट असल्याने जाळी टाकणे शक्य नाही. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील तिन हजारपैकी सुमारे तीस टक्केच मच्छीमार मासेमारीला जात आहेत. त्यात वार्‍याचा अडथळा असल्यामुळे ती संख्या कमी आली आहे. श्रावण सुरु झाल्यामुळे माशांच्या दरांवर परिणाम झाला आहे. बांगड्याला चार दिवसांपुर्वी 32 किलोच्या एका डिशला 5 हजार रुपये दर मिळत होता. सध्या तो चार हजार रुपयेच मिळत आहे. हजार रुपयांची घट झाली आहे. पर्ससिननेट सुरु झाली की ते आणखी उतरतील असे मच्छीमारांचे मत आहे. श्रावणामुळे माशांची मागणी कमी झाली आहे. अनेक छोटे मच्छीमार अजुनही समुद्रात जात नाहीत. तसेच मोठी चिंगूळ 400 रुपये किलोने तर चालू चिंगूळ 100 रुपये किलोेने विकली जात आहे.

मासळी किनारी भागाजवळ मिळत आहे. गिलनेटधारी नौकांना किनार्‍यावर येऊन मासेमारी करावी लागते. या नादात अनेकांच्या जाळ्यांचे नुकसान होत आहे. किनारी भागात खडकांच्या रांगा असतात. मासे पकडण्याच्या नादात खडकात जाळी अडकुन त्याचे नुकसान होत आहे. मिर्‍यापासून काही अंतरावर मासेमारीसाठी आलेल्यांना याचा अनुभव आला आहे. त्या मच्छीमारांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.