भातशेती नुकसान भरपाई पोटी जिल्ह्याला 40 लाख 

रत्नागिरी:-अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसान भरपाई पोटी शासनाने ४७ कोटी ८३ लाख ५२ हजार इतका निधी वाटपास मंजुरी दिली असून रत्नागिरी जिल्ह्यातील बाधित ७३५ शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईसाठी ३९ लाख ९३ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकर्‍यांना मदत वाटप करण्यासाठी राज्य शासनाने ४७ कोटी ८३ लाख ५२ हजार इतका निधी विभागीय आयुक्तांमाफत वितरीत करण्यास मान्यता देण्यात दिली आहे. त्यात कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील बाधित ११३४ शेतकर्‍यांसाठी ६८ लाख ९१ हजार रुपये इतका निधी देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील २०५ शेतकर्‍यांच्या बाधित ६०.५० हेक्टर क्षेत्रातील नुकसानीसाठी १० लाख ९७ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ७३५ शेतकर्‍यांच्या बाधित २१५.१९ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीसाठी ३९ लाख ९३ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९४ शेतकर्‍यांच्या बाधित १००.६७ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीसाठी १८ लाख १ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.