मंडणगड:- तालुक्यात शासनाने कोट्यवधींचा खर्च करून बांधलेल्या सहा मध्यम व लघु आकाराच्या जलप्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांना गळती लागली आहे. चाळीस वर्षांचा कालावधी लोटला असून गळती, कालव्यांच्या अर्धवट कामांमुळे धरणांचा मूळ उद्देशच साध्य झालेला नाही. या परिस्थितीला शासन, प्रशासनाची उदासीन मानसिकतेसोबत स्थानिकांचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. परिणामी धरणामुळे होणारी कृषी संपदा कधीही तालुक्यात दिसलीच नाही. पावसात ओव्हरफ्लो होणारे हे जलप्रकल्प फक्त डोळ्यांना सुखावणारे ठरत असून निधी खर्च करण्याचे माध्यम ठरत आहेत.
तालुक्याची भौगोलिक रचना डोंगराळ, दरीखोऱ्यांची. वर्षानुवर्षे शेतकरी भात, नाचणी पिकांपुरता मर्यादित राहिला. दरवर्षी सरासरी सुमारे ३५०० हजार मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस पडूनही येथील जलसिंचन वाढले नाही. याला अपूर्णावस्थेतील जलप्रकल्प कारणीभूत ठरले आहेत. १९७९ ला चिंचाळी हे पहिले धरण बांधण्याची सुरवात झाली. तांत्रिक दोषांमुळे ते आजही पूर्ण झालेले नाही. गळती लागल्याने चिंचाळी व तुळशी धरण धोकादायक असल्याचे जलसंधारण विभागाने तिवरे दुर्घटनेनंतर स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये घोषित केले आहे. चिंचाली धरणाचा सांडवा व भिंत पुन्हा काढून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे तर तुळशीला दुरुस्तीची अजूनही प्रतीक्षा आहे.
भोळवली धरणाच्या गळतीमुळे भारजा नदीला बारमाही पाणी वाहते आहे. त्या पाण्यावर कलिंगड व भाजीपाला शेती करण्यात येते, हीच एक आश्वासक बाब आहे. वेळास येथील व्याघ्रेश्वर प्रकल्पाची तीच अवस्था असून आता यात या पावसाळ्यात गळती लागल्याने पणदेरी धरणाची भर पडली आहे. तिडे धरणाचे काम प्रगतीपथावर आहे.
धरणांमुळे तालुक्यातील १३४६ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली येण्याची अपेक्षा होती. परंतु एक हेक्टरही जमीन ओलिताखाली आलेली नसल्याचे वास्तव आहे. हे स्थापत्यशास्त्रातील तंत्रज्ञानातील त्रुटींमुळे की यंत्रणेला लागलेल्या गळतीमुळे याची उत्तरे गुलदस्त्यात आहेत. उपयोगापेक्षा डागडुजीवर अधिक खर्च करण्यात आला आहे. धरणातून वर्षानुवर्षांचा गाळ भरला असून अर्धवट अवस्थेतील कालवे बुजायला लागले आहेत. धरणग्रस्त गावांच्या विहिरींची पाणीपातळी वाढविण्याव्यतिरिक्त त्यांचा मूळ उद्देशच साध्य न झाल्याने हे जलप्रकल्प फक्त निधी खर्च करण्याची माध्यम ठरत आहेत.