ग्रामीण भागात घरे बांधताना निसर्गाचे विश्लेषण होणे आवश्यक: ना. सामंत 

रत्नागिरी:- जिल्ह्यात झालेल्या नैसर्गिक दुर्घटना पाहता यापुढे ग्रामीण भागात घरे बांधताना निसर्गाचे विश्लेषण होणे आवश्यक आहे. भविष्यातील परिस्थितीचा अभ्यास अधिकारी व तज्ज्ञांनी करावा, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या स्व. शामराव पेजे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाआवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेतील विविध पुरस्कारांचे वितरण मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाजकल्याण सभापती परशुराम  कदम, पंचायत समिती सभापती संजना माने, जि.प. सदस्य बाबू म्हाप, प्रकाश रसाळ, सौ. ऋतुजा जाधव, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मंत्री सामंत म्हणाले, आज दीप अमावस्या असून चांगला दिवस आहे. या दिवशी चांगले काम आपल्या हातून घडत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या स्वप्नातील घरे सर्वसामान्यांना देण्याचे काम येथील अधिकारी वर्ग चांगल्या पध्दतीने करीत आहेत. वर्षभरापूर्वी ही योजना आली असली तरी कोरोनाच्या काळात अतिशय चांगले काम केले गेले आहे. घर बांधणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते तो श्रीमंत असो की गरीब, ते बांधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. ज्यांची परिस्थिती नाही त्यांचे स्वप्न पूर्ण करणारी ही योजना आहे.

यावेळी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार  शिवारआंबेरेला मिळाला. द्वितीय पुरस्कार साठरे तर तृतीय पुरस्कार नेवरे ग्रामपंचायतला प्राप्त झाला. या योजनेत सर्वोत्कृष्ट घरकुल प्रकारात राधिका कृष्णा कुळ्ये (शिवारआंबेरे), निशा भरत शिंदे (टिके), सुनिता रामचंद्र मालप (सत्कोंडी) यांना पुरस्कार देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्कार कोतवडे विभागाला मिळाला आहे.

रमाई आवास योजनेत सर्वोत्कृष्ट घरकुल योजनेत रणजित लक्ष्मण जाधव (वरवडे), अनिल पांडुरंग यादव (चवे), मोहन चंद्रकांत पवार (सैतवडे) यांना पुरस्कार दिले आहेत. या योजनेत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत वळके, द्वितीय हरचिरी तर तृतीय क्रमांक ओरीने पटकावला तर सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून करबुडे ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला.