पुरामुळे उध्वस्त झालेल्या लोटिस्मा वस्तूसंग्रहालयाच्या उभारणीसाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे विनोदवीर खेळणार ‘कोण होणार करोडपती?’

चिपळूण:- आपले समाजाप्रती कर्तव्य जाणून हास्यजत्रेची टीम कोण होणार करोडपतीच्या मंचावर आली आहे. सचिन मोटे, सचिन गोस्वामी, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले हे विनोदवीर लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूणसाठी आज शनिवारी खेळणार आहेत.
 

जुलै महिन्यात आलेल्या महाभयंकर पुरानं लोकमान्य टिळक स्मारक मंदिर उद्ध्वस्त  केलं आहे. हे संग्रहालय आणि ग्रंथालय जिद्दीनं पुन्हा उभं करता यावं यासाठी हे विनोदवीर ज्ञानाचा हा खेळ खेळणार आहे. या वर्षी लोकमान्य टिळकांचं १०१वं पुण्यसमरण झालं. चिपळूणला लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आहे जिथे हजारो पुस्तकं, अश्मयुगीन हत्यारे, शिवकालीन ढाल तलवारी, सातवाहन काळातील नाणी, वेगवेगळ्या कालखंडातील दस्तऐवज, मूर्ती, नाणी, भांडी, दिवे, जन्मपत्रिका, मान्यवर नेत्यांच्या स्वाक्षऱ्या अशा सर्व गोष्टींचा संग्रह केलेला आहे. संपूर्ण कोंकणात असे पहिलेच ऐश्वर्य संपन्न संग्रहालय आहे. टिळकांचा ज्ञानाचा वारसा जपण्याचा प्रयत्न इथे पुरेपूर केलेला दिसतो पण  हे संग्रहालय जिद्दीनं पुन्हा उभं करता यावं यासाठी हास्यजत्रेतील विनोदवीरांनी मदतीचा हात पुढे केला आहे. चिपळूणमधील १५६ वर्षांचा हा वाचन इतिहास पुन्हा उभा करण्यासाठी अशोक नायगावकर आणि इतर सर्वजण आपल्यापरीने मदत करत आहेत. दर शनिवारी कोण होणार करोडपती  कर्मवीर विशेष भाग होतो. कर्मवीरच्या भागामध्ये स्पर्धक येऊन सामाजातील गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. या शनिवारी कोण होणार करोडपती विशेष भाग होणार असून त्यात हास्यकलाकार हॉटसीटवर खेळणार आहेत. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांना मदतीचा हात म्हणून हास्यकलाकार कोण होणार करोडपतीच्या मंचावर आले. इथे जिंकलेली रक्कम ही लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण याच्या उभारणीसाठी वापरण्यात येणार आहे.