रत्नागिरी:-रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार आता गोवळ परिसरात सुरू झाले आहेत. अशाच एका व्हॉट्स ॲप ग्रुपवरून रिफायनरीचे समर्थन केल्यामुळे नरेंद्र राजाराम जोशी (गोवळ, खालचीवाडी) याने धमकी दिल्याची तक्रार गौरव महेश परांजपे यांनी राजापूर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
राजापूर तालुक्यातील गोवळ भागात रिफायनरी प्रकल्प होण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. या प्रस्तावित रिफायनरीच्या प्रकल्पाची माहिती प्रत्यक्ष घेतली व गावातील काही मंडळींना तो प्रकल्प चांगला आहे, असे प्रबोधन गेले दोन महिने करत आहे. परंतु, मी करत असणारे सकारात्मक काम गावातील काही वाईट विचार करणाऱ्या मंडळींना पटत नाहीत, असे परांजपे यांनी या तक्रार अर्जात म्हटले आहे.
नरेंद्र जोशी व त्याच्या जमावातील व्यक्तींना चिथवण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम सत्यजित चव्हाण करीत असल्याचे परांजपे यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे. संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी गौरव परांजपे यांनी केली आहे.
मानसिक खच्चीकरण करणारा मेसेज
गोवळ गावातील स्थानिक ग्रामस्थ व मुंबई येथे राहणारे ग्रामस्थ यांचा ‘गोवळ माझं गाव’ असा व्हॉट्स ॲप ग्रुप आहे. त्यामध्ये सध्या मुंबईला राहणारे नरेंद्र राजाराम जोशी हे देखील आहेत. या ग्रुपवर सर्व सदस्य नेहमी कोणत्या ना कोणत्या पोस्ट शेअर करीत असतात. सोमवारी (ता. २) नरेंद्र जोशी यांनी, मला दुखावण्याच्या हेतूने तसेच माझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी व मला बदनाम करण्यासाठी ‘आमच्या वाडीत कोण जर आला ना विचारायला तर कपडे काढून मारीन’ असा मेसेज केल्याचे परांजपे यांनी तकार अर्जात नमूद केले आहे.