सह्याद्रीतील गावांचे जीओलॉजिकल सर्वेक्षण अत्यावश्यक

धोका टाळण्यासाठी भूगर्भ अभ्यासकांचे मत

रत्नागिरी:- पोसरे, तळीयेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सह्याद्रीच्या डोंगररांगातील गावांचे जीओलॉजिकल सर्वेक्षण करून अतिधोकादायक ठिकाणे निश्‍चित करणे काळाची गरज आहे. त्या वाडीवस्तीवर लक्ष केंद्रित करून धोका दर्शविणारी यंत्रणा बसविण्यासह कोकण रेल्वे मार्गावर अवलंबलेली पाणी निचरा करण्यासाठीची सी आकाराची रचना वित्तसह जीवितहानी टाळणारी ठरू शकते. याला भूगर्भ अभ्यासकांनीही दुजोरा दिला आहे.

जुलै महिन्यात १ हजार मि.मी. विनाखंड पाऊस पडल्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, साताऱ्‍यात दरडी कोसळण्याचे प्रकार घडले. पोसरे, तिवरे, गोळप, तळीये येथे डोंगरात तीव्र उतारावरील माती शंभर मीटरच्या भागात खाली आली. त्यात मनुष्यहानीसह वित्तहानीही झाली. बदलत्या वातावरणामुळे भविष्यात या घटना वारंवार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून उपाययोजना करणे आवश्यक आहेत. भूस्खलन प्रतिबंध उपाययोजना अवलंबण्यापूर्वी पश्‍चिम घाटाचे भूगर्भीय व भौगोलिक सर्व्हेक्षण अत्यावश्यक आहे.

पश्‍चिम घाटात प्रत्येक गावांना अति, मध्यम व कमी भूस्खलन धोका पातळीत शास्त्रीय पद्धतीने विभागणी केली पाहिजे. गावनिहाय अग्रक्रम ठरविल्यास भूस्खलन होण्याआधी सूचना देणारी यंत्रणा (अर्ली वार्निंग सिस्टीम) मानवी जीवितहानी संभाव्य क्षेत्रात स्थापित करणे शक्य आहे. हा प्रयोग कोकण रेल्वे रुळावर झाला होता. तसेच उपग्रहीय छायाचित्रांचा वापर, भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर, विविध ठिकाणच्या भूगर्भीय नमुन्यांचे परीक्षण, अशा विविध विषयांवर भूस्खलन अभ्यासासाठी अधिक संशोधन होणे आवश्यक आहे.

डोंगराळ भागात पाणी निचरा करण्याचे व्यवस्थापन भुस्खलनाची तीव्रता कमी करतो. याचा कोकण रेल्वे मार्गावर पोमेंडीसह काही ठिकाणी उपयोग केला आहे. पोमेंडीत संरक्षक भिंतीचाही प्रयोग अयशस्वी झाला होता. तेथे डोंगरामध्ये टप्प्या टप्प्याने पायऱ्‍या करुन पाणी निचरा होण्यासाठी गटार काढली. सी आकाराची रचना करून घाटमाथ्यावरुन तीव्र उताराच्या दिशेने येणारे पाणी वळवण्यासाठी पर्यायी नाला तयार केला. हा फंडा धोकादायक मानवी वस्त्यांमध्ये उपयुक्त ठरेल.

डोंगरातून खाली येणारी माती रोखण्यास संरक्षक भिंती उपयुक्त ठरत नाहीत. त्यामुळे कुटुंबांचे स्थलांतर हा मोठा पर्याय आहे. या लोकांना इंदिरा आवासमधून आपत्कालीन परिस्थितीच्या कारणाने अन्यत्र घरे उभारण्यास साह्य करता येऊ शकेल.