ज्येष्ठ नडले अन् मारुती मंदिर गाळ्यांचे दरवाजे उघडले 

मोठ्या बोल्या फिस्कटल्या; विरोधाची घडीदेखील विस्कटली 

रत्नागिरी:- सर्वात मोठा गाजावाजा झालेल्या गाळे प्रकरणात आता सार्‍यांनीच ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतली आहे. ७५ लाखांची बोली आता काही लाखांत आल्याने  कोणत्या निकषात हा बदल झाला, याबाबत मात्र चर्चा नगरपरिषदेत सुरू आहे. गाळ्यांच्या वितरणात सेटिंग झाली असून यात जेष्ठांची दादागिरी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

रत्नागिरीतील शिवाजी स्टेडियम येथील गाळ्यांचा वाद चांगलाच गाजला. हा वाद न्यायालयातदेखील गेला होता. मात्र नगरपरिषदेने कायद्याचा आधार घेत हे प्रकरण चांगलेच रेटवले. यातील ३ गाळ्यांची फेरनिविदा करण्यात आली होती. त्यावरुन यापूर्वी झालेल्या नगरपरिषदेच्या सभेत विरोधकांनी सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.  छत्रपती शिवाजी स्टेडियममधील ४, ५, १५ क्रमांकांचे गाळे मागच्या लिलावात मोठ्या रकमेत गेले होते. परंतु ज्यांना हे गाळे मिळाले, त्यांनी त्या गाळ्यांची अधिमूल्य रक्कम (प्रिमियम) ते पैसे भरून ताब्यात घेतले नाहीत.फेर निविदेत हे गाळे पूर्वीच्या लिलावातील रकमेपेक्षा कमी अधिमूल्य रकमेत गेले. प्रत्येकी ८ लाख २६ हजार ६० रुपयांच्या प्रिमियम रकमेमध्ये या गाळ्यांचा लिलाव झाला. पूर्वी हे गाळे यापेक्षा अधिक रकमेच्या बोलीने गेले होते. यातील १ गाळा ७५ लाखाला तर उर्वरित २ गाळे २० लाखांपेक्षा अधिक प्रिमियम रकमेत गेले होते. आता ही प्रिमियम रक्कम इतकी कमी कशी झाली? असा सवाल उपस्थित होत असून एरव्ही सभागृहात मोठमोठ्याने ओरडणार्‍या विरोधकांनीदेखील ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतली आहे. मारुती मंदिर येथील गाळे  म्हणजे लोण्याचा गोळा आणि हा लोण्याच्या गोळ्यातील काही भाग आपल्यालादेखील मिळावा यासाठी बैठकांवर बैठका झाल्या. शिवाजीनगर परिसरात या बैठका झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. लिलाव प्रक्रियेत १ गाळा ७५ लाखाला तर २ गाळे २० लाखापेक्षा अधिक प्रिमिअम रकमेत गेले होते. मग फेरनिविदेत अशी कोणती जादू झाली की, प्रिमियम रक्कम ८ लाखांपर्यंत आली. कोणत्या कायद्याच्या आधारे ही फेरनिविदा करण्यात आली यासह विविध प्रश्‍न या प्रकारावरून उपस्थित होऊ लागले आहेत. सध्या नगरपरिषदेत एका कर्मचार्‍याचे नावदेखील या प्रकरणात पुढे आले आहे. या कर्मचार्‍याची मान वाचवण्यासाठी सारा खटाटोप केेल्याची खुमासदार चर्चा नगरपरिषदेत सुरू आहे.