रत्नागिरी जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश; जिल्ह्यातील निर्बंध हटवले

रत्नागिरी:- जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश झाल्याने जिल्ह्यातील कठोर निर्बंध शिथिल करण्याची घोषणा करण्यात आली. जिल्हाधिकारी यांचे आदेश निघताच जिल्ह्यातील सर्व दुकाने खुली झाली आहेत. दुपारी चार वाजेपर्यंत विक्री तर दहा वाजेपर्यंत पार्सल सुविधा देण्याची मुभा असल्याने व्यापारी वर्ग खुश झाला आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्याचा चौथ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला आहे.  जिल्हा तिसऱ्या टप्प्यात आल्याने सर्व प्रकारची दुकाने चार वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.कोविडचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी जमाव होण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी खबरदारी घेणे आवश्यक आहे. रत्नागिरी शहरातील सर्व दुकानांच्या आस्थापनावर काम करणाऱ्या कर्मचारी तसेच दुकानदार यांचे कोविड दुसऱ्या लसीकरणाचे प्रमाणपत्र दर्शनी भागात लावण्यात यावे. तसेच दुकानात नागरिकांची गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. ग्राहकांना मास्क लावल्याशिवाय दुकानात प्रवेश देऊ नये. सॅनिटायझर वापरणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत सूचना ग्राहकांना देण्यात याव्यात,असेही प्रशासनाने सांगितले आहे.

ज्यांचे कोविडचे लसीकरण पूर्ण झालेले नाही त्यांची टेस्ट नगर परीषदेचे फिरते पथक करणार असल्याने टेस्टींगचे कर्मचारी आल्यास त्यांना सहकार्य करावे. या सूचना शहरातील सर्व व्यापाऱ्यांपर्यंत पोहचतील याची दक्षता घ्यावी, असे पत्र व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना तहसीलदार शशिकांत जाधव यांनी पाठविले आहे.