पोसरेतील 16 मृतांच्या नातेवाईकांना दिलेले मदत दुसऱ्याच दिवशी परत नेली

बसपाचा आरोप; दरडग्रस्तांची क्रूर चेष्टा 

रत्नागिरी:- खेड तालुक्यातील पोसरे गावात दरड कोसळून 17 जण गाडले गेले. त्यात 16 जणांचे मृतदेह सापडले. या मृतांच्या वाचलेल्या कुटुंबियांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला. परंतु हे धनादेश दुसर्‍या दिवशी तलाठ्यांनी येऊन परत नेले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे अद्यापपर्यत बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. मग हे धनादेश पालकमंत्र्यांनी फोटोसेशनसाठी दिले काय? असा प्रश्‍न बसपाचे प्रदेश सचिव राजेंद्र आयरे यांनी उपस्थित केला आहे. ही दरडग्रस्तांची क्रुर चेष्ठा असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

यासंदर्भात बसपाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अनिकेत पवार, राजू जाधव, प्रेमदास गमरे, अनंत पवार, बी.आर. जाधव व बबलू जाधव हे उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना आयरे यांनी शासनाचा निषेध केला. चिपळुणात महापुराने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले, ही घटना गंभीर आहे. परंतु त्यापेक्षाही पोसरे येथे 17 जणांचे प्राण दरड घटनेत गेले. राज्याचे मुख्यमंत्री चिपळुणला आले. महाडजवळ तळीये गावात गेले. परंतु पोसरेतील कुटुंबियांच्या दु:खात त्यांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ मिळाला नाही.

घटनेच्या चार दिवसानंतर पालकमंत्री अनिल परब यांनी पोसरे गावाला भेट दिली. यावेळी मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांना 4 लाखाचे धनादेश दिले. मात्र दुसर्‍या दिवशी तलाठी यांनी सर्वाचे धनादेश परत घेतले, त्यावेळी तुमच्या खात्यात जमा केले जातील असे सांगण्यात आले. परंतु अद्यापही या नातेवाईकांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. आपद्ग्रस्त कुटुंबांची ही एकप्रकारे चेष्टा असल्याचा आरोप राजेंद्र आयरे यांनी केला. जिल्हाधिकार्‍यांनी यात लक्ष घालावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पोसरे बौध्दवाडीतील 16 कुटुंबाच्या स्थलांतराचा मुद्दा महत्वाचा आहे. येथील दरडग्रस्त कुटुंबाचे स्थलांतर ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आले आहे. पोसरे येथेच शासनाने 16 कुटुंबाचे कायमस्वरुपी स्थलांतर करावे, त्याचप्रमाणे कोळकेवाडी येथील विद्युतकॉलनीत बंद असलेल्या घरांमध्ये तात्पुरते स्थलांतर करण्यात यावे अशी मागणीही अनिकेत पवार यांनी केली. पोसरे बौध्दवाडीतील दरडग्रस्तांना न्याय न मिळाल्यास, 16  कुटुंबियांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण करु असाही इशारा त्यांनी दिला आहे.