1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू होण्यावर अनिश्चिततेचे ढग  

किनारपट्टी भागात हवामान खराब; खलाशी देखील सापडेना 

रत्नागिरी:-शासनाच्या निर्देशाप्रमाणे मासेमारी बंदी कालावधी 1 ऑगस्टपासून संपत असल्यामुळे पर्ससिननेट वगळता अन्य मच्छीमारी नौकांद्वारे मासेमारीला सुरवात होणार आहे; परंतु सध्या किनारी भागात हलका वारा असल्यामुळे मासेमारी सुरु करण्याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. या परिस्थितीत धोका पत्करुन काही ट्रॉर्लस्द्वारे मासेमारीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. मिरकरवाडा बंदरामध्ये काही मच्छीमारांनी हालचालीही सुरु केल्या आहेत.

कोविडची परिस्थिती आणि बिघडलेले वातावरण यामुळे मागील दोन हंगामात मच्छीमारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. गतवर्षी पावसाळा लांबल्यामुळे समुद्रही खवळलेलाच होता. डिसेंबर महिन्यात बर्‍यापैकी वातावरण निवळले; मात्र मे महिन्याच्या शेवटी तौक्ते वादळाने दणका दिला. मार्च ते मे या काळात कोरोनातील बंदीचा फटका मच्छीमारीला बसला होता. कोरोना निर्बंधांमुळे मच्छीमारांना कारभार हाकता आलेला नव्हता. परराज्यातून येणार्‍या खलाशांची उपलब्धतता, व्यावसायासाठी आर्थिक चणचण, डिझेल परतावा रखडल्यामुळे मागील हंगामात मच्छीमार अडचणीत सापडले होते. अजुनही कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. त्यावर मात करत मच्छीमार समुद्रावर स्वार होण्यासाठी सरसावणार आहेत.

शासनाने 1 जुन ते 31 जुलै हा कालावधी मासेमारी बंदीसाठी निश्‍चित केला आहे. त्यानुसार 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरवात करता येईल. यामध्ये ट्रॉलर, गिलनेट, डोलनेट व इतर लहान-मोठ्या बोटींद्वारे मासेमारी करण्यास परवानगी आहे. पर्ससिननेटला 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर हा कालावधी देण्यात आला आहे. आठ दिवसांपुर्वी वादळी वार्‍यांसह अति मुसळधार पाऊस झाला होता. वेगवान वार्‍यांमुळे समुद्रही खवळलेला आहे. वातावरण स्थिरावू लागले असले तरीही अजुन किनारी भागात वारे आहेत. पाण्यालाही करंट असल्याने छोट्या नौका समुद्रात नेणे धोकादायक ठरु शकते. वातावरणांचा अंदाज नसल्यामुळे अनेक मच्छीमारांनी अजुनही मासेमारीला जाण्यासाठी तयारी केलेली नाही. त्यामुळे बंदी उठल्यानंतर दोन-पाच टक्केच नौका मासेमारीसाठी जातील असा अंदाज वर्तविला जात आहे. यामध्ये काही ट्रॉलर्स्चा समावेश असेल.