पश्चिम किनार्‍यासाठी रत्नागिरीत डॉपलर वेदर रडार उभारा

 माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केंद्र सरकारकडे केली मागणी 

रत्नागिरी:- जिल्ह्यात आणि विशेष करून चिपळूण, संगमेश्वर या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवली. संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रातदेखील अशीच परिस्थिती आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर भारतीय हवामान खात्याने दीर्घ पल्ल्याच्या पल्स डॉपलर वेदर रडारची स्थापना रत्नागिरीत करण्याचे घोषित केले आहे. परंतु, अद्याप त्याचे काम सुरू झालेले नाही. जागतिक पातळीवर तसेच मुख्यत्वे करून अरबी समुद्रामध्ये हवामानाची परिस्थिती ज्या पद्धतीने बदलत आहे त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम किनार्‍यासाठी रत्नागिरीत डॉपलर वेदर रडार बसवा अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांनी भूगर्भ शास्त्र मंत्रालय भारत सरकारला पत्राद्वारे केली आहे.  

 वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीतील घटनांच्या पार्श्वभूमीवर अचूक आणि लवकर अंदाज घेण्याच्या आवश्यकतेची तीव्रता वाढली आहे. धोक्याची पूर्वसूचना अर्धा धोका कमी करते. डॉपलर वेदर रडारउपकरणाची सुमारे ४०० की. मी. क्षेत्रावर कार्य करण्याची क्षमता असून त्याची हवामानाच्या अंदाजाची अचूकता देखील मोठ्या प्रमाणात आहे. रत्नागिरी नजीकच्या पूरग्रस्त भागात आणि कोकण व महाराष्ट्रात राहणार्‍या नागरिकांची सुरक्षितता आणि त्यांचे कल्याण याची काळजी घेण्यास प्रशासनासाठी ही यंत्रणा अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे.    

अतिवृष्टी, वादळे या गोष्टींचा लवकर अंदाज आल्यास पूर्व उपाययोजना करण्यास अधिक वेळ मिळेल. यामुळे मोठ्या प्रमाणात होणार्‍या दुर्घटना टाळण्यास सध्याच्या तुलनेत जास्त मदत होईल. देशाची पूर्वेकडील किनारपट्टी बर्‍याच अंशी अशा 11 रडारनी नियंत्रित केली आहे. याउलट, पश्चिम किनारपट्टी आणि पश्चिम घाट भागातील अशा रडारची कमतरता हवामानखात्याच्या अचूक आणि कार्यक्षम हवामान अंदाज वर्तवण्याच्या क्षमतेस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करीत आहे.  

कोकणच्या अगदी मध्यभागी म्हणजेच रत्नागिरीत, उत्तर केरळ व कर्नाटकच्या किनाऱ्यावर योग्य ठिकाणी असे अतिरिक्त रडार बसवणे आवश्यक आहे. ही रडार यंत्रणा बसविण्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची व  पुढील पावसाळा हंगामपूर्वी ते पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाने त्याला प्राधान्य देण्याची मागणी मिलिंद किर यांनी या पत्राद्वारे केली आहे.