जल जीवन मिशनसाठी गाव कृती आराखडा

 7 ऑगस्टची डेडलाईन; दुसऱ्या टप्प्यात जिल्हा कृती आराखडा 

रत्नागिरी:- जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत गावकृती आराखडा पंधरवडा अभियान राबवण्यात येणार आहे. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना घरगुती कार्यान्वीत नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा करण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात गाव कृती आराखडा तर नंतर जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. 
 

22 जुलै ते 7 ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये ‘गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान’ जिल्ह्यामध्ये राबविण्याबाबत येत आहे. ग्रामीण भागात प्रत्येक पात्र कुटुंबाला शुध्द पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत ग्रामीण भागात व्यापक जनजागृती करण्यात आणि गाव कृती आराखडा तयार करण्यासाठी 22 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीमध्ये विशेष अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियान कोविडच्या पार्श्वभूमीवर कोबो कलेक्ट हया डिजीटल माध्यमाचा उपयोग करुन जिल्हा, तालुका व गाव पातळीवर करण्यात येणार आहे. जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशिक्षित मनुष्यबळाच्या समन्वयाने गाव कृती आराखडयाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गावपातळीवर संकलित झालेली माहिती व आकडेवारी डिजीटल माध्यमातून भरुन पुढे पाठवुन जमा झालेल्या माहितीवर प्रक्रिया करुन गाव कृती आराखडा निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच पुढील टप्प्यात जिल्हा कृती आराखडा निर्मिती करुन अंतिम आराखडा 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभामध्ये मंजुरीकरीता ठेवण्यात येणार आहेत.
 

जल जीवन मिशन पाणी व स्वच्छता विभागाच्या सहाय्याने कार्यकारी अभियंता ( ग्रापापु ), उप अभियंता ( ग्रापापु ), शाखा अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर, जिल्हा कक्षाच्या सनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार यांना झुम ॲपद्वारे गाव कृती आराखडा माहिती संकलन मोहिम राबविण्याची प्रक्रिया कोबो टुलद्वारे माहिती अपलोड याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. तसेच दुसऱ्या टप्प्यात उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) , उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ), उप अभियंता, शाखा अभियंता, भूवैज्ञानिक, मनुष्यबळ विकास सल्लागार, सनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार, पाणी गुणवत्ता सल्लागार तर तालुका स्तरावरील गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी ( पंचायत ), उप अभियंता / शाखा अभियंता, गट समन्वयक / समुह समन्वयक, अंमलबजावणी सहाय्य संस्थेचे प्रतिनिधी यांना झुम अॅपद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तालुका पातळीवरील सर्व गट विकास अधिकारी यांचेकडून २८ व ३१ जुलै  रोजी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गाव कृती आराखडयामध्ये सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक / पंप ऑपरेटर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे दोन प्रतिनिधी यांना झुम अॅपद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.