साखरपा-खाडीकोळवण येथे डोंगर खचला; रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प, गावांचा संपर्क तुटला

संगमेश्वर :- जिल्ह्यातील साखरपा जवळील खडीकोळवण भागाला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. खडीकोळवण येथे डोंगर खचल्याने मातीचा ढिगारा कोसळला आहे. येथील काही घरांना धोका पोहोचला आहे. तर काही ठिकाणी डोंगराला भेगा गेल्या आहेत. रस्ताही खचला आहे. तसेच रस्त्यावर दरड आल्याने वाहतूक ठप्प झाल्याने काही गावाचा संपर्क तुटला आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जवळील खडीकोळवण येथे दरड कोसळल्याने ग्रामस्थ भितीच्या छायेखाली आहेत. पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कोसळलेल्या दरडीची माती घरांवर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. खडीकोळवण हे गाव सह्याद्रीच्या खुशीत वसले आहे. गावाच्या चारीबाजूनी डोंगर असून विशाल डोंगरांच्या मध्यभागी खोऱ्यात गाव वसले आहे. त्यामुळे धोका अधिक आहे.

दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर खचल्याने पावसामुळे डोंगराची माती वाहून खाली आली असून चिखल साचला आहे. काही घरांना धोका पोहोचला आहे. पाऊस असाच पडत राहला तर खडीकोळवण गावाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान, या ठिकाणी जिल्हा प्रशासन पोहोचलेले नाही. त्यामुळे खडीकोळवण येथील ग्रामस्थ मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.