चिपळूणातील नुकसानग्रस्तांना योग्य मोबदला देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची

रत्नागिरी :- चिपळुणात आलेल्या पुरामुळे तेथील व्यापारी व नागरिकांवर अस्मानी संकट कोसळले आहे. व्यापार्‍यांच्या मालाचे व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना योग्य मोबदला देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची असून, कंपन्यांनी जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विमा प्रतिनिधींना सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला बारा कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी कशा प्रकारे पंचनामे करता येतील याबाबत चर्चा करण्यात आली. व्यापार्‍यांना व वाहन धारकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची आहे. विमा उतरवण्यासाठी विमा प्रतिनिधी नागरिकांच्या मागे फिरत असतात. मात्र, नुकसान भरपाई देण्याची वेळ आल्यावर कंपन्या वेगवेगळी कारणे देतात व नुकसान भरपाईत हात आखडता घेतात. सन 2005 साली आलेल्या पुरात अशाच प्रकारे कंपन्यांनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे आता कंपन्यांनी वरिष्ठांशी बोलून योग्य नुकसान भरपाई व्यापार्‍यांना द्यावी, असे ना. सामंत यांनी स्पष्ट शब्दात सुनावले. व्यापारी व विमा कंपनी प्रतिनिधींची बैठक शनिवारी दुपारी 12 वाजता चिपळूण पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. विमा प्रतिनिधींनी योग्य मार्गदर्शन व्यापार्‍यांना करावे, अशा सूचना ना. सामंत यांनी केल्या आहेत.

चिपळूण प्रमाणेच खेड, संगमेश्‍वर, चांदेराई येथील व्यापार्‍यांनाही त्याच पद्धतीने नुकसान भरपाई द्यावी, असे स्पष्ट शब्दात सांगितले. यावेळी कोकण आयुक्‍त आण्णासाहेब मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड व अधिकारी उपस्थित होते.