जिल्हा पोलिस दलाने राबवले ऑपरेशन ‘ऑल आऊट’

रत्नागिरी:- जिल्ह्यात बकरी ईद सण शांततेत पार पडावा, या उद्देशाने जिल्हा पोलिस दलाने जनजागृतीसह जिल्ह्यात ऑलआऊट ऑपरेशन राबविले. १० दिवसांत गुन्हेगारी यादीवरील ४२ हिस्ट्रीशिटर तसेच ६७ माहितगार गुन्हेगार तपासण्यात आले. ३१ अवैध दारु व्यवसायांविरुध्द छापे टाकण्यात आले. आठवडयाच्या कालावधीत विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दंगा काबू योजनेच्या १७ रंगीत तालीम घेण्यात आल्या. ५६ अधिकारी, ४४६ अंमलदार, एसआरपीएफच्या २ प्लाटुन्स असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

राज्य शासनाच्या वतीने ईद सणाची नमाज ही घरीच अदा करण्याबाबत व प्रतिकात्मक स्वरुपात कुर्बानी देण्याबाबत आवाहन केलेले होते. त्या अनुषंगाने जिल्हयात पोलिस दलाच्या वतीने शांतता समितीच्या २८ तसेच मोहल्ला कमिटीच्या ४७ बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली. गोवंश हत्येस प्रतिबंध असल्याने अशा जनावरांची वाहतूक अगर मांस वाहतूक होऊ न देण्यासाठी जिल्हयात सर्व पोलिस ठाणे हद्दीत नाकाबंदी, चेकपोस्ट कार्यान्वीत करण्यात आली. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्थेस बाधा पोहोचविण्यासाठी समाजकंटकांना संधी मिळू नये, यासाठी पोलिसांनी जिल्हयातील उपद्रवी इसमांवर लक्ष ठेवून विविध कलमांनुसार प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या.

या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. १९) सायंकाळी सात ते मंगळवारी (ता. २०) पहाटे तीनपर्यंत जिल्हयात ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले होते. या कारवाई अंतर्गत जिल्हयामध्ये एकूण ४३ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मोटार वाहन कायदयान्वये १०६ केसेस करण्यात आल्या, ६४ हॉटेल, लॉज तपासण्यात आले, मास्क न घालण्याऱ्या ११ व्यक्तींविरुध्द कारवाई करण्यात आली, अत्यावश्यक सेवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर २ गुन्हे दाखल करण्यात आले, अवैध दारु बाबत ६ गुन्हे दाखल करण्यात आले, एकूण ४५ गुन्हेगारांना तपासण्यात आले. सदर मोहिमेत जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक व अन्य अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला. कोरोनाच्या सावटाखाली होणाऱ्या या सणादरम्यान मुस्लीम धर्मीयांनी शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत बकरी ईदची नमाज घरीच अदा केला.