जिल्ह्यात 4 लाख 75 हजार जणांचे लसीकरण 

3 लाख 75 हजार जणांना पहिला तर 99 हजार 979 जणांना दुसरा डोस

रत्नागिरी:-कोरोना बाधितांवर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून वेगाने पावले उचलली जात असताना कोरोना लसीकरणासाठीही नियोजनबध्द पावले उचलली जात आहेत. आतापर्यंत 4 लाख 75 हजार 535 जणांना लस देण्यात आली आहे. त्यातील 3 लाख 75 हजार 556 जणांनी पहिला डोस घेतला असून दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या 99 हजार 979 आहे.

कोरोना लस योग्य प्रमाणात पुरवली जात नसल्यामुळे वितरणावेळी गोंधळ होत आहे. ऑनलाईन नोंदणीबरोबरच ऑफलाईनही लस दिली जात आहे. भौगोलिक अडचणीमुळे ग्रामीण भागात ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नाही. तिथे ऑफलाईन सुविधाही ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग आला आहे. जिल्ह्यातील 11 लाख 82 हजार 314 जणांचे लसीकरण करावयाचे आहे. त्यातील 3 लाख 75 हजार 556 जणांनी पहिला डोस घेतला असून हे प्रमाण 31.76 टक्के आहे. दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या 99 हजार 979 असून हे प्रमाण 8.46 टक्केच आहे. दोन्ही डोस घेणार्‍यांची संख्या 4 लाख 75 हजार 535 इतकी आहे.

ग्रामीण भागात लसीकरण व्यवस्थिती व्हावे यासाठी उपकेंद्रस्तरावर शिबिरे घेतली जात आहे. शासनाकडून आठवड्यातून दोनचवेळा लस मिळत आहे. तीही पाच ते दहा हजारापर्यंत असते. ऑनलाईन नोंदणीसाठी शहरी भागातील काही नागरिक आरोग्य केंद्रात अपॉईटमेंट घेतात. मात्र प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर लस नाही, असे सांगितले जात आहे. अनेकांनी माघारी परतावे लागले आहे. याबाबत पावस केंद्रातील एक घटनाही पुढे आली आहे. ग्रामीण भागातील लोकांना लस मिळण्यासाठी काही केंद्रावर हे प्रकार सुरु आहेत. लस कमी असल्यामुळे अजुन 8 लाखाहून अधिक लोकांना पहिला डोस घ्यावयाचा आहे. दिवसाला दीड ते दोन हजारच लोकांना लस मिळत आहे. हे लक्ष पूर्ण करण्यासाठी दीड वर्षे लागेल असा अंदाज बांधला जात आहे.