जरंडेश्‍वरला दिलेले कर्ज सुरक्षित, नियमांना धरुन

डॉ. तानाजी चोरगे; कर्जविषयक माहिती ‘ईडी’कडे सादर

रत्नागिरी:- जरंडेश्‍वर शुगर मिल्स कंपनीला केलेला कर्जपुरवठा सुरक्षित असून नियमांचे पालन करुनच 8 कोटी 75 लाखाचे कर्ज वितरीत केले. जुन महिन्यात दिलेल्या कर्जावरील व्याजाचा पहिला हप्ता जुलै महिन्यात बँकेकडे जमाही झाला आहे. यासंदर्भात मागवण्यात आलेली सर्व माहिती ईडीकडे सादर केली आहे, असे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सांगितले.

बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. डॉ. चोरगे म्हणाले, जरंडेश्‍वर कारखान्यासंदर्भात ईडीकडून व्यवहारातील पारदर्शकता तपासली जात आहे. त्यांच्या पत्रानुसार कर्ज कोणत्या प्रकारचे दिले, मॉर्गेजविषयक माहिती, कर्ज वितरणाचा कालावधी, कर्ज वितरण कोणत्या पध्दतीने झाले, जरंडेश्‍वर कंपनीचे प्रमुख यासह अन्य काही कागदपंत्रांची माहिती मागवली होती. ती रत्नागिरी बँकेकडून सादर केली आहे.

ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कर्जासंदर्भात आवाहन केले होते; मात्र बॅकेने पूर्णतः माहिती घेऊन चांगल्या कारखान्याला कर्ज पुरवठा केला आहे. त्याचा कोणताही परिणाम बँकेवर होणार नाही. जरंडेश्‍वर कंपनीने ज्या कारणासाठी कर्ज घेतले आहे, त्यानुसार विनियोग होतो की नाही याची माहिती दर तिन महिन्यांनी घेतली जाणार आहे. बँकेने दिलेले कर्ज सुरक्षित आहे. जरंडेश्‍वर सहकारी शुगर मिल्स प्रा. लिमीटेड कंपनीने जरंडेश्‍वर साखर कारखाना चालवण्यास घेतली आहे. शुगर मिल्स कंपनीने उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी लिड बँकेसह पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 259 कोटीच्या कर्जाची मागणी केली होती. पाच बँकांनी मिळून मंजूर केलेल्या 167 कोटीपैकी 58 कोटी रुपये जुन महिन्यात वितरीत केले. रत्नागिरी बँकेने 8 कोटी 75 लाखाचे कर्ज जुन 2021 ला 12 टक्के व्याजाने दिले. कर्ज देताना बँकेकडून उपाध्यक्षांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने कारखान्याची परिस्थिती प्रत्यक्ष जाऊन पाहीली होती. परतफेडीची शहानिशा करुनच कर्ज मंजूर करण्यात आले आहे. कर्ज देताना 425 कोटीची मालमत्ता तारण म्हणून पुणे बँकेकडे आहे. तसेच जुलै महिन्याच्या सुरवातीलाच व्याजाचा पहिला हप्ता जमा झाला आहे.