कोकण विभागीय मंडळाचा दहावी निकाल १०० टक्के

पुणे:- यंदा दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकणाचा निकाल सर्वाधिक म्हणजे १०० टक्के लागला आहे. या निकालासाठी एकूण ७२ विषयांचं मूल्यमापन करण्यात आले. त्यापैकी २७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत दिली आहे.

विभागनिहाय निकाल
▪️कोकण १०० टक्के
▪️पुणे ९९.९६ टक्के
▪️नागपूर ९९.८४ टक्के
▪️औरंगाबाद ९९.९६ टक्के
▪️मुंबई ९९.९६ टक्के
▪️कोल्हापूर ९९.९२ टक्के
▪️अमरावती ९९.९८ टक्के
▪️नाशिक ९९.९६ टक्के
▪️लातूर ९९.९६ टक्के

राज्यातल्या एकूण २२ हजार ७६७ शाळांपैकी २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मार्च २०२० च्या निकालाच्या तुलनेत हा निकाल ४. ६५ टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात यंदाही दहावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली वरचढ ठरल्या आहेत. यंदाच्या वर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींचा निकाल ९९.९६ टक्के लागला असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांनीही उत्तम कामगिरी केली असून त्यांचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे. तर खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्यांची संख्या २८ हजार ४२४ असून त्यांचा निकाल ९७.४५ टक्के लागला आहे.