राजापूर:- जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून राजापूरात पुन्हा एकदा कोदवली आणि अर्जुना नद्यांना पूर आला असून या पुराच्या पाण्याने जवाहर चौकाला वेढा दिला आहे. बुधवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान पुन्हा एकदा पुराचे पाणी शहरात शिरले होते. तर या पुराच्या पाण्यामुळे जवाहर चौकासह शिवाजीपथ, बंदरधक्का, मुन्शीनाका, वरचीपेठ, कोंढेतड परिसर पाण्याखाली गेला आहे.
राजापूर हर्डी रानतळे मार्गावर यावर्षीही सुमारे दिड ते दोन रस्ता खचला असून या मार्गावरिल अवजड वाहनांची वाहतुक बंद करण्यात आली आहे. तर तालुक्यात शिवणे बुद्रुक येथे रस्त्यावर दगड व माती आल्याने हा मार्ग वाहतुकीला धोकादायक झाला आहे. रविवार पासूनच राजापूर शहर आणि तालुका परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला. या पुराच्या पाण्यात राजापूरात एक इसम वाहूनही गेला. सोमवारी दिवसभर राजापूरात पुर परिस्थिती होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र मंगळवारी सकाळी पुर ओसरला आणि राजापूरातील जनजीवन पुर्वपदावर येऊ लागले. मात्र तरीही पाऊस पडतच असल्याने पुराचा धोका कायम होता. राजापूरात बुधवारी १८९ मीमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत तालुक्यात एकुण १९७५ मिमी इतका पाऊस पडला आहे.मंगळवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा बुधवारी सकाळी राजापूरात पूर आला. अर्जुना व कोदवील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पुराच्या पाण्याने थेट जवाहर चौकापर्यंत धडक मारली. दुपारी काही प्रमाणात पाऊस कमी झाला मात्र पुराचे पाणी जवाहर चौकात तळ ठोकून होते. संतत धार पडणाऱ्या पावसाचा ग्रामीण भागालाही तडाखा बसला आहे. राजापूर हर्डी रानतळे धारतळे रत्नागिरी मार्गावर गतवर्षी ज्या ठिकाणी हर्डी येथे रस्ता खचला होता त्याच ठिकाणी बुधवारी पुन्हा एकदा सुमारे दोन ते तीन फुट रस्ता खचला असून वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. तात्काळ तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी या ठिकाणी भेट देत पहाणी केली व हा रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तात्काळ सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर यांना उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.शिवणे बुद्रुक मार्गावरही दरड कोसळून दगड व माती रस्त्यावर आल्याने हा रस्ता देखील वाहतुकीला धोकादायक बनला आहे. या ठिकाणीही तहसलीदारल सौ. प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी सागर पाटील यांनी भेट देत पहाणी केली. तर मिठगवाणे सुवर्णदुर्गावाडी येथे प्रज्वला तुकाराम वैद्य यांचे घराचा एक भाग कोसळून त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.