भरपावसात देशमुख कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरूच 

रत्नागिरी:- न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साखळी उपोषण करणार्‍या विलास देशमुख आणि त्यांच्या कुटुबियांकडे जिल्हा प्रशासनाकडून पाठ फिरवण्यात आली आहे. नऊ दिवस हे कुटूंबिय आणि ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमनचे (आफोह) पदाधिकारी भर पावसातही आंदोलनाला बसलेले आहेत.

शासनाच्या 21 डिसेंबर 2019 च्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडील सेवामुक्त लिपिक- टंकलेखक विलास देशमुख यांना अधिसंख्य पदाचे आदेश मिळावेत अशी मागणी करण्यात आली होती. परंतु जिल्हा प्रशासनाकडून त्यावर कार्यवाही केलेली नाही. यासाठी 5 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले. अधिसंख्य सेवानिवृत्त कर्मचा-यांना 18 महिन्यापासून थांबवण्यात आलेली पेन्शन न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून त्वरीत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनाला आफोह संघटनेकडून पाठींबा देण्यात आला आहे. भर मुसळधार पावसातही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशदारासमोर सुरू असलेले देशमुख कुटुंबीय व आफोहच्या पदाधिकारी-सभासदांच्या  उपोषणाकडे  कानाडोळा करत असल्याचा आरोप आफोह संघटनेकडून केला जात आहे. देशमुख यांना अधिसंख्य पदाचे आदेश देण्यासाठी केवळ शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे एवढेच काम असताना मात्र नकारार्थी भूमिका घेवून  हेतुपुरस्सर टाळाटाळ करण्यासाठी  25 सप्टेंबर 2020 रोजी शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले. शासनाकडून मार्गदर्शन करण्याची आवश्यकताच नाही. तरीही प्रशासन वेळकाढू पणा करत आहे, असे आफोहचे गजेंद्र पौनीकर यांनी सांगितले. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नसल्याने त्यांच्यासोबत उपोषणाला बसण्यासाठी आफोह पुण्याची टीम रत्नागिरीत दाखल होणार आहे. त्याचबरोबर आफोहचे राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते हे सुद्धा रत्नागिरीत येत असून जिल्हाधिकार्‍याची भेट घेणार आहेत.